कोकण मार्गावर तीन महिन्यांत पकडले १४,१५० फुकटे प्रवासी; ८६ लाखांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 08:00 AM2023-11-24T08:00:08+5:302023-11-24T08:01:12+5:30
सणांदरम्यान जास्त प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : रेल्वेत फुकट्या प्रवाशांची संख्या काही कमी नसते. हे फुकटे प्रवासी रेल्वे तिकीट तपासणी करणाऱ्यांच्या हातीही लागतात. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई सुरू असून, या वर्षीच्या ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यात १४,१५० जणांवर कारवाई करताना त्यांच्याकडून ८६ लाख ३७ हजार ८२० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
सणाच्या दिवशी विशेषतः गणेश चतुर्थी व दिवाळीच्यावेळी रेल्वेचे आरक्षण फुल्ल असते, या काळात अनेकजण विनातिकीट प्रवास करण्याचे डेअरिंग करतात व ते त्यांच्या अंगलटही येते. त्यामुळे असा फुकटा प्रवास न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ८६ लाख ३७ हजार रुपये तीन महिन्यात फुकट्या प्रवाशांकडून वसूल करण्यात आले. चालू वर्षाच्या ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांत १४ हजार १५० फुकट्या प्रवासांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई केली आहे. एकूण ८६,३७, ८२० रुपये दंडही वसूल करून घेण्यात आला.
दिवाळीला रेल्वेला गर्दी
दिवाळीला नेहमीच रेल्वेला गर्दी असते. रेल्वे प्रवास हा सोयीस्कर व आरामदायी असल्याने लोक रेल्वेतून प्रवास करणे पसंत करतात. दिवाळीच्या वेळी स्पेशल रेल्वेही धावतात, मात्र रेल्वेची तिकीट मिळणे अनेकदा दुरापास्त ठरते. एवढी प्रवाशांची गर्दी असते.
आरक्षण मिळेना
दिवाळीला रेल्वेचे आरक्षण मिळणे महाकठीणच असते. सर्वच रेल्वे फुल्ल असतात, मोठ्या प्रमाणात लोक आपल्या गावी येत असतात. तसेच सुट्या असल्याने पर्यटनासाठीही जात असतात. त्यामुळे रेल्वेत लोकांची गर्दी असते, आरक्षित तिकीट मिळणे अनेकदा मुश्कील असते.
गोव्यात मुंबईला जाणाऱ्यांची तसेच मुंबईहून गोव्यात येणाऱ्यांची संख्या जास्त असते. दिवाळीला तर या मार्गावरून धावणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्या फुल्ल असतात. रेल्वे प्रवासात विनातिकीट प्रवास करणे हा गुन्हा आहे. अशा प्रवाशांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. प्रवाशांनी अधिकृत तिकीट काढूनचनंतर रेल्वेतून प्रवास करावा. - बबन घाटगे, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी कोकण रेल्वे.