निष्पाप चिमुरडीचा बलात्कार आणि खून करणाऱ्या आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
By पंकज शेट्ये | Published: April 18, 2024 09:05 PM2024-04-18T21:05:33+5:302024-04-18T21:05:42+5:30
गुरूवारी (दि.१८) त्यांची कोठडी संपत असल्याने पोलीसांनी पुन्हा त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.
वास्को: वाडे, दाबोळी येथे साडेपाच वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या प्रकरणात वास्को पोलीसांनी पाच दिवसापूर्वी अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. पाच वर्षीय मुलीवर बलात्कार आणि तिचा खून केलेल्या प्रकरणात पोलीसांनी २२ वर्षीय उपनेश कुमार (मूळ: बिहार) आणि २४ वर्षीय मुरारी कुमार (मूळ: बिहार) यांना अटक केल्यानंतर त्यांना पहिल्यांदा न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले होते. गुरूवारी (दि.१८) त्यांची कोठडी संपत असल्याने पोलीसांनी पुन्हा त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.
१२ एप्रिल रोजी वाडे तालावाजवळ बांधकाम चालू असलेल्या एका इमारतीच्या परिसरात संशयास्पद मरण पावलेल्या साडेपाच वर्षीय मुलीवर मडगाव जिल्हा इस्पितळात शवचिकीत्सा केली असता तिचा बलात्कार करून गळा आवळून खून केल्याचे शवचिकीत्सक अहवालातून उघड झाले होते. त्या साडेपाच वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याचे उघड झाल्यानंतर पोलीसांनी आरोपींना गजाआड करण्यासाठी सर्व मार्गाने चौकशीला सुरवात केली होती. चौकशीला सुरवात करून २४ तासात पोलीसांनी मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या आरोपींना गजाआड केले होते. पोलीसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे उपनेश कुमार आणि मुरारी कुमार अशी असल्याची माहीती पोलीसांकडून प्राप्त झाली होती. मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे ते आरोपी वाडे येथील बांधकाम चालू असलेल्या इमारतीत मजुर म्हणून कामाला असून एकटा पेंटर तर दुसरा गवंडी काम करायचा अशी माहीती मिळाली होती. दोन्ही आरोपी बिहार येथील असून एका वर्षापासून ते वाडे येथे बांधकाम चालू असलेल्या इमारतीत मजूर म्हणून काम करत होते. १३ एप्रिल रोजी पोलीसांनी मुलीवर बलात्कार आणि तिची हत्या करण्याच्या प्रकरणात अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केल्याची माहीती मिळाली होती.
दरम्यान वास्को पोलीसांनी १३ एप्रिल रोजी दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना ५ दिवसांच्या पोलीस कोठडीत घेण्याचा आदेश न्यायाधिक्षाने दिला होता. गुरूवारी त्यांची पोलीस कोठडीत संपत असल्याने त्यांना पुन्हा प्रथम श्रेणी न्यायालयात उपस्थित केले असता न्यायाधीक्षाने त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश दिल्याची माहीती वास्को पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिली.