गोव्यात सरकारी खात्यांची वीज बिलांची १४0 कोटींची थकबाकी: निलेश काब्राल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 06:42 PM2019-10-04T18:42:59+5:302019-10-04T18:43:56+5:30
गोव्यात सरकारी खात्यांकडेच सुमारे १२५ ते १४0 कोटी रुपयांची वीज बिलांची थकबाकी असल्याचे वीजमंत्री निलेश काब्राल यांनी स्पष्ट केले.
पणजी: गोव्यात सरकारी खात्यांकडेच सुमारे १२५ ते १४0 कोटी रुपयांची वीज बिलांची थकबाकी असल्याचे वीजमंत्री निलेश काब्राल यांनी स्पष्ट केले. ही सर्व थकबाकी वसूल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एका कार्यक्रमानिमित्त आले असता प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी सवाल केला असता त्यांनी ही माहिती दिली.
वीज बिलांची एकूण थकबाकी ३५0 कोटींची आहे त्यात सरकारी खाती आघाडीवर आहेत. ज्यांनी बिलांचे पैसे भरलेले नाहीत त्यांच्याविरुध्द वसुलीसाठी येत्या नोव्हेंबरपासून धडक कारवाई केली जाईल. त्यासाठी खटले घालण्याची तयारीही सरकारने ठेवली आहे. याबाबतीत अनेकांना वीज खात्याने नोटिसा बजावलेल्या आहेत, असे काब्राल यांनी सांगितले. खात्याने चार दिवसांपूर्वी पणजी महापालिका मार्केटची वीज ६ कोटींच्या बिल थकबाकीमुळे तोडलेली आहे. त्याआधी म्हापसा पोलिस स्थानकाचीही वीज तोडली होती.
पर्यावरणीय कायद्यांबाबत काब्राल म्हणाले की, पर्यावरणीय कायदे आणि आर्थिक घडामोडी हातात हात घालून पुढे जाऊ शकत नाहीत, असे मत पर्यावरणमंत्री निलेश काब्राल यांनी व्यक्त करताना पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्यांनी देशाच्या आर्थिक स्थितीचाही विचार करायला हवा, असे काब्राल यांनी स्पष्ट केले.