गोव्यात १.४८ कोटींच्या जुन्या नोटा केल्या जप्त, केरळच्या पाच जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 05:39 AM2020-01-11T05:39:45+5:302020-01-11T05:39:59+5:30
जुन्या एक हजाराच्या नोटा गोव्यात बदलून घेण्यासाठी आलेल्या कासरगोड—केरळ येथील पाचजणांना गुरुवारी रात्री काणकोण येथील पोळे चेक नाक्यावर अटक करण्यात आली.
मडगाव/काणकोण : दोन वर्षांपूर्वी चलनातून काढून टाकलेल्या तब्बल १.४८ कोटीच्या जुन्या एक हजाराच्या नोटा गोव्यात बदलून घेण्यासाठी आलेल्या कासरगोड—केरळ येथील पाचजणांना गुरुवारी रात्री काणकोण येथील पोळे चेक नाक्यावर अटक करण्यात आली. एका कारमधून ते गोव्यात आले होते.
गोव्यात जुन्या नोटा विकत घेतल्या जातात, याची माहिती मिळाल्यामुळेच हे संशयित गोव्यात आले होते. मात्र गोव्यात त्यांचा नोटा संदर्भातील व्यवहार होऊ न शकल्यामुळे ते पुन्हा कासरगोडला परतत होते. गोव्यात नोटा बदलण्यासाठी ते कुणाकडे आले होते, याचा शोध काणकोण पोलीस घेत आहेत. अटक केलेल्या संशयितांना काणकोण न्यायालयाने तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी कोलवाळच्या तुरुंगात करण्यात आली आहे. एवढे मोठे घबाड पकडून देण्यात मोलाची कामगिरी बजावलेले पोलीस कॉन्स्टेबल भगवान सावंत यांनी दाखविलेल्या धाडसीपणाबद्दल कौतुक होत आहे.