रस्ता रुंदीकरणावेळी समोर आला जुना खजिना, सापडले 14 व्या शतकातील मंदिराचे अवशेष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 04:46 PM2020-06-30T16:46:15+5:302020-06-30T16:46:47+5:30
नावेली येथे रस्ता रुंदीकरणाचे काम चालू असताना केलेल्या खोदाईत हे अवशेष सापडले आहेत.
मडगाव - राष्ट्रीय महामार्गाच्या विस्ताराचे काम चालू असताना नावेली येथे जुन्या मंदिराचे अवशेष सापडले असून, त्यामुळे या भागात तो चर्चेचा विषय बनला आहे. हे अवशेष नेमक्या कुठल्या काळातील मंदिराचे हे तपासण्यासाठी लवकरच भारतीय पुरातत्व खात्याचे अधिकारी या परिसराला भेट देणार आहेत. नावेली येथील सेंट झेवियर्स चॅपेलच्या जवळ हे अवशेष सापडले असून, पुरातनकाळी या परिसरात मंदिर होते हे स्पष्ट झाले आहे. एका स्थानिकाने या अवशेषांची माहिती पुरातत्व खात्याला दिल्याची माहिती या खात्याचे सहाय्यक अधीक्षक वरद सबनीस यांनी दिली.
नावेली येथे रस्ता रुंदीकरणाचे काम चालू असताना केलेल्या खोदाईत हे अवशेष सापडले आहेत. मात्र कदाचित पोर्तुगिज काळात या जागेवर असलेले मंदीर पाडून त्या जागी ख्रिस्ती धर्मस्थळ उभारले असावे, ही शक्यता सबनीस यांनी फेटाळून लावली. ते म्हणाले, नावेलीतील सेंट झेवियर्सचे चॅपेल हे हल्लीच्या काळात बांधलेले आहे. त्यामुळे जुने मंदिर मोडून तिथे नवीन कपेल बांधले ही शक्यता नाही. मागच्या आठवडय़ात भारतीय पुरातत्व खाते आणि गोव्यातील पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी या जागेची पहाणी केली होती. या जागेची आम्हाला परत पहाणी करायची आहे. आणखीही काही अवशेष या ठिकाणी आहेत का हे शोधून काढण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत.
हे मंदीर 13व्या किंवा 14 व्या शतकातील असावे असा अंदाज आहे. मात्र नक्की कुठल्या काळातील हे अजून स्पष्ट झालेले नाही. सध्या पाऊस असल्यामुळे रस्ता विस्ताराचे काम बंद करण्यात आले आहे. या जागेची पहाणी करण्यासाठी पुरातत्व खात्याने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे परवानगी मागण्याचे ठरविले आहे. हे अवशेष एक तर पुरातत्व खात्यात किंवा राज्य सरकारच्या संग्रहालयात ठेवण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.