गोव्याच्या सरकारी रुग्णालयात दीड हजार ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 01:37 PM2017-12-20T13:37:59+5:302017-12-20T13:39:17+5:30
राजधानी पणजीपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या गोव्यातील बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयात (गोमेको) गेल्या तीन वर्षांत एकूण दीड हजार ओपन हार्ट शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.
पणजी : राजधानी पणजीपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या गोव्यातील बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयात (गोमेको) गेल्या तीन वर्षांत एकूण दीड हजार ओपन हार्ट शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. याशिवाय पाचशे हृदयरोगविषयक अन्य शस्त्रक्रिया पार पडल्या. यात गोव्यासह कर्नाटक आणि महाराष्ट्रातील रुग्णांवरही झालेल्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
हृदयरोग तज्ज्ञ डाॅ. शिरीष बोरकर यांनी ही माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्या उपस्थितीत बुधवारी येथे दिली. गोमेको हे आशिया खंडातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय आहे. पोर्तुगीजांची राजवट गोव्यात असताना ते सुरू झाले होते. देशातील कोणत्याच सरकारी रुग्णालयात ज्या सुविधा पहायला मिळत नाहीत त्या सगळ्या गोव्यातील या सरकारी रुग्णालयात आहेत. त्यामुळेच कर्नाटक आणि महाराष्ट्रातूनही रूग्ण येथे येतात.
तीन वर्षांपूर्वी गोमेकोमध्ये हृदयरोग शस्त्रक्रियांचा सुपरस्पेशालिटी विभाग सुरू झाला. रूग्णांची संख्या वाढल्यामुळे प्रतीक्षा यादी वाढत आहे. दीड महिना रुग्णांना प्रतीक्षेत रहावे लागते. बुधवारी तेरा खाटांचा पोस्ट आॅपरेशन अतिदक्षता विभाग गोमेकोमध्ये सुरू करण्यात आला. यामुळे रुग्णांचा प्रतीक्षा कालावधी दीड महिन्यावरून एक महिन्यापर्यंत कमी होईल, असे गोमेको इस्पितळाच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितले. हृदयरोगविषयक पदवी शिक्षणाचा अभ्यासक्रम येत्या वर्षांपासून गोमेकोमध्ये सुरू केला जाईल असे डीन डाॅ. प्रदीप नाईक यांनी सांगितले.
दरम्यान हृदयरोगविषयक प्राथमिक उपचार तरी जलदगतीने व्हावेत म्हणून पाच कार्डियाक रूग्णवाहिका सरकार सुरू करणार आहे. राज्यात हृदयरोगाचा धक्का बसण्याचे प्रकार वाढत आहेत. तरुणांमध्येही अलिकडे असे रूग्ण सापडतात असे आरोग्य मंत्री राणे यांनी सांगितले. पाच रुग्णवाहिकांमध्ये प्रत्येकी एक हृदयविषयक ज्ञान असलेला डाॅक्टर नियुक्त केला जाईल. गोव्यात असे डाॅक्टर मिळत नसल्याने परप्रांतामधून डाॅक्टर आणले जातील असे मंत्री राणे यांनी सांगितले.