10 महिन्यांत गोव्यातील समुद्र किना-यांवर 15 पर्यटकांना जलसमाधी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 05:10 PM2018-10-13T17:10:10+5:302018-10-13T17:24:14+5:30

कळंगूटला सर्वात जास्त दुर्घटना : समुद्राचे ज्ञान नसल्यामुळेच पर्यटकांचा जीव धोक्यात

15 tourists have drowned in goa sea coast last 10 months | 10 महिन्यांत गोव्यातील समुद्र किना-यांवर 15 पर्यटकांना जलसमाधी

10 महिन्यांत गोव्यातील समुद्र किना-यांवर 15 पर्यटकांना जलसमाधी

Next

सुशांत कुंकळयेकर

मडगाव - गोव्यातील समुद्राच्या फेसाळत्या लाटा पर्यटकांना आपल्याकडे खेचून घेत असल्या तरी या लाटा काहीजणांच्या काळही ठरल्या आहेत. मागच्या दहा महिन्यात तब्बल 15 पर्यटकांना गोव्यातील समुद्रात जलसमाधी मिळाली आहे. गोव्यातील समुद्राच्या वातावरणाची आवश्यक ती माहिती नसल्यामुळेच पर्यटकांवर ही आपत्ती येत असल्याचे आतार्पयतच्या घटनांवरुन सिद्ध झाले आहे. दोन दिवसांपूर्वी कळंगूट येथे खवळलेल्या दर्यात उतरलेले असताना विश्वास नाईक या 19 वर्षीय मध्य प्रदेशाच्या अभियांत्रिकी शिक्षण घेणा-या विद्यार्थ्याला बुडून मरण आले होते. लुबान चक्रीवादळामुळे दर्याचे पाणी खवळलेले असताना 11 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आठ जणांचा गट पाण्यात उतरला होता. त्यापैकी तिघांना लाटेने ओढून आत नेले होते. यापैकी दोघांना आपला जीव वाचविण्यास यश आले.  मात्र विश्वास समुद्राच्या पोटात ओढला गेला.

आतापर्यंत गोव्यातील समुद्रात बुडून मरण्याच्या 18 घटना घडल्या आहेत. त्यातील तब्बल सात जणांना मृत्यू कळंगूटच्या समुद्रात आला आहे. यापूर्वी 11 जूनला अकोला (महाराष्ट्र) येथून आलेल्या अशाच एका गटातील पाच जणांना या समुद्रात जलसमाधी मिळाली होती. कळंगूटलाच मोठ्या प्रमाणावर पर्यटकांचे बळी का जातात याबद्दल स्थानिक पोलीस स्थानकाचे निरीक्षक जीवबा दळवी यांना विचारले असता ते म्हणाले, कळंगूटचा समुद्र काहीसा उतरता आहे. या समुद्रातील पाण्यात उभे राहिल्यास लाटाबरोबर पायाखालची रेती खचली जाते. कित्येकवेळा भरतीच्यावेळी जोरदार लाटेने माणूस आत ओढला जातो. अशावेळी पाय घट्ट रोवून पाण्यात उभे रहावे लागते. या किना-यावर येणा-या कित्येक पर्यटकांना याची माहिती नसते. त्यामुळे पाण्यात खेचले गेल्यानंतर ते घाबरुन हात-पाय गाळून बसतात. या घाबरलेल्या अवस्थेत ते पाण्यात खेचले जातात.

दळवी यांचा निष्कर्ष दोन दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनेत तंतोतंत लागू होतो. वास्तविक इंदूर मध्य प्रदेशातून आलेला हा गट तसा फार खोल पाण्यात गेला नव्हता. किना-यावरच हा गट उभा होता. असे असतानाही त्यापैकी तिघेजण लाटेच्या जोराने आत ओढले गेले. यापूर्वी 21 मे रोजी आशिष रामटेक या महाराष्ट्रातील 20 वर्षीय विद्यार्थ्यालाही याचप्रकारे या समुद्रात मृत्यू आला होता. गोव्यातील समुद्र किना-यावर लोकांचे जीव वाचावेत यासाठी जीवरक्षकांची तैनात केलेली आहे. मात्र कित्येकवेळा जीवरक्षकांनी धोक्याची सूचना देऊनही ती पाळली जात नाही. कित्येकवेळा सेल्फी काढण्याच्या नादात पर्यटक समुद्रात ओढले जातात.

कळंगूटपासून काही अंतरावर असलेल्या बागा समुद्रावर 17 जूनला अशीच घटना घडली होती. भर पावसात दर्या खवळलेला असताना तिथे जवळ असलेल्या दगडावर उभे राहून सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात असलेला तामिळनाडूचे तीन पर्यटक मोठ्या लाटेच्या तडाख्यात पाण्यात खेचले गेले होते. त्यापैकी दोन पर्यटक वर आले पण एका पर्यटकाचा जीव गेला. त्याच दिवशी या बीचपासून अवघ्याच अंतरावर असलेल्या सिकेरी येथील बीचवरही तामिळनाडूच्या एका पर्यटकाला मृत्यू आला होता.

कळंगूट पाठोपाठ अंजुणा समुद्रावर दोन पर्यटकांचा जीव गेला असून 12 जानेवारी रोजी अंजुणा बीचवर श्रीधर पिल्ले या 23 वर्षीय केरळच्या एका सिनेकलाकाराला मृत्यू आला होता. तर 10 एप्रिल रोजी याच बीचवर केरळच्याच सुदेश अरविंद हा 34 वर्षीय पर्यटक बुडाला होता. दक्षिण गोव्यात समुद्रात बुडून मरण्याच्या एकूण चार घटना घडल्या असून त्यात  पाळोळे समुद्र किना-यावर 4 एप्रिल रोजी तामिळनाडूच्या एस. बालाजी याला तर 9 फेब्रुवारीला काणकोणच्याच पाटणे समुद्र किना-यावर कॅजी लुईस या 20 वर्षीय ब्रिटीश पर्यटकाला मृत्यू आला होता. 30 ऑगस्टला बाणावली समुद्र किना-यावर पवनकुमार या 36 वर्षीय बंगाली पर्यटकाचा जीव गेला होता. याशिवाय मोरजी, वागातोर आणि केरी या पेडणे भागातील समुद्र किना-यावरही तीन पर्यटकांना आपला जीव समुद्रात गमवावा लागला होता.

 

Web Title: 15 tourists have drowned in goa sea coast last 10 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.