१५ वर्षांच्या मुलाचे देशविरोधी कनेक्शन; तिस्क - उसगाव येथे 'एनआयए'चा छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 01:12 PM2023-09-15T13:12:22+5:302023-09-15T13:12:35+5:30
संशयिताची कसून चौकशी; मोबाईलही जप्त.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: देश विघातक कारवायांचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (एनआयए)चे पथक काल पहाटे ५.३० च्या सुमारास गोव्यात दाखल झाले. या पथकाने फोंडा तालुक्यातील तिस्क उसगाव येथे छापा टाकून दहावीत शिकणाऱ्या मुलाची चौकशी सुरू केली. यावेळी त्यांनी त्या मुलाचा मोबाईल, सीमकार्ड तसेच पेनड्राईव्ह जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने देशविरोधी कारवाया करणाऱ्यांविरोधात दंड थोपटले आहेत. विविध राज्यांमध्ये छापेमारी सुरू असून संशयितांना ताब्यात घेऊन कारवाई केली जात आहे. या मोहिमे अंतर्गत देशविरोधी कारवाया केल्याचे धागेदोरे गोव्यात आढळून आल्याने एनआयएचे पथक काल तिस्क उसगाव येथे दाखल झाले. उसगाव येथील १५ वर्षांच्या मुलाचा देशविरोधी कारवायात सहभाग असल्याची माहिती एनआयएच्या पथकाला मिळाली होती.
त्यानुसार त्यांनी काल पहाटे संशयित मुलाच्या घरावर छापा मारला. पहाटे ५.३० पासून ९.३० पर्यंत एनआयएच्या पथकाचे अधिकारी व फोंडा पोलिसांनी मुलाच्या चौकशीसह घराची झडती घेतली. या पथकाने मुलाकडील मोबाईलसह इतर वस्तू जप्त केल्या आहेत. या मुलाचे कुटुंबीय मूळ उत्तर प्रदेशमधील असून गेल्या दहा वर्षांपासून ते इथे वास्तव्यास आहेत.
सध्या एनआयएने उत्तरप्रदेश, झारखंड आदी भागांत देशविरोधी कारवाया संदर्भात शोधमोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत लखनौमधील एक घर दहशतवादाच्या कारवाईचे केंद्र घोषित केले आहे. या मालमत्तेचा वापर अल-कायदाशी संलग्न असलेल्या अन्सार गजवत-उल- हिंद संघटनेच्या सक्रिय सदस्याने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घरात दहशतवादी हल्ले करण्यासाठी तयारी सुरु होती. त्याचवेळी एका प्रकरणाचा तपास करताना एनआयएला गोवा कनेक्शन आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
'सोशल' खाती लॉक
एनआयएचे पथक गोव्यात येईपर्यंत संबंधित मुलाविषयी फोंडा पोलिसांना कसली माहिती नव्हती. छाप्यात या मुलाची एनआयए पथकाने कसून चौकशी केली. हा मुलगा सोशल मीडियावरही खूप सक्रिय होता. त्याच्या सर्व पोस्ट पथकाने तपासल्या आहेत. संबंधित मुलाची इंस्टाग्राम व टेलिग्रामवरील खाते पथकाने लॉक केले आहे.
'त्या' मुलाला झारखंडला बोलावले
एनआयएच्या पथकाने अधिक चौकशीसाठी मुलाचा मोबईल ताब्यात घेतला आहे. छाप्यात त्यांना आणखी काही धागेदोरे मिळाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, देश विरोधी कारवाया केल्याच्या प्रकरणाता आता अधिक चौकशीसाठी संबंधित मुलास पालकांसह २२ सप्टेंबर रोजी झारखंड येथे बोलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.