फेरीबोटीसाठी दुचाकींना १५० तर चारचाकींना ६०० रुपयांचा पास; येत्या १५ दिवसांत अंमलबजावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 09:42 AM2023-11-02T09:42:56+5:302023-11-02T09:43:15+5:30
यापुढे दुचाकींनाही शुल्क द्यावे लागणार: शिरोडकर.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गेल्या अनेक वर्षांपासून फेरीबोटीतून मोफत प्रवास करणाऱ्या दुचाकीवाल्यांना आता प्रति महिना १५० रुपयांचा पास काढावा लागणार आहे. तर पास नसल्यास प्रत्येक फेरीला १० रुपये आकारले जाणार आहेत. तसेच चारचाकी वाहनांनाही ६०० रुपयांचा महिन्याचा पास काढावा लागणार असल्याची माहिती नदी परिवाहन खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.
नदी आणि परिवहन खात्याकडून येत्या १५ दिवसात या निर्णयाची अंमलबजावणी सुरु केली जाणार आहे. नदी परिवाहन खात्याकडे एकूण ३२ फेरीबोटी आहेत. त्यापैकी २८ फेरीबोटी या राज्यात १८ जल मागांवर कार्यरत आहेत. राज्यातील फेरीबोटीत दुचाकींना मोफत प्रवेश देण्यात येत होता. परंतु आता खात्याला मोफत सेवा देणे परवडत नसल्याने शुल्क लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले. ज्या वाहकांकडे पास नसेल त्या दुचाकीवाल्यांना १० रुपये शल्क भरावे लागणार असल्याचे शिरोडकर म्हणाले.
फेरीबोटीतून वर्षाला फक्त ७० लाख रुपये इतके उत्पन्न मिळत आहे. खाते प्रति ताफ्यासाठी वर्षाला सुमारे १ कोटी रुपये खर्च करते. दर महिन्याला प्रत्येक फेरी बोटीवरील कर्मचाऱ्यांच्या पगारावरही २.५ लाख रुपये खर्च करावे लागतात, त्यानंतर इंधन शुल्क आणि देखभाल खर्चही आहे. हे सर्व खात्याला न परवडणारे असल्याचे मंत्री शिरोडकर यांनी असल्याचे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.
नद्यांवर पूल नसल्याने गोव्यात ज्या जलमार्गावर फेरीबोट सेवा चालू आहे, त्यातील रायबंदर- चोडण फेरीसेवा ही नेहमीच वर्दळीची असते. केवळ चोडण बेटावरील लोकच या फेरीसेवेवर अवलंबून नाहीत, तर डिचोली, मये भागातील लोकही पणजीला येण्यासाठी चोडण फेरीबोटीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. हा जलमार्ग राज्यातील सर्वात व्यस्त असा जलमार्ग आहे. एका फेरीबोटीच्या दिवशी सुमारे १२० फेऱ्या होतात.
वर्षाला ४५ कोटी खर्च
खात्याला ३२ फेरीबोटी चालवण्यासाठी वर्षाला ४५ कोटी रुपये खर्च करावे लागतात. मात्र शुल्क लागू केल्यानंतर किमान ४ कोटी तरी महसूल मिळणार आहे. उत्पन्नाची खर्चाशी तुलना केली तर तर ते खूपच कमी आहे. फेरीबोट चालविण्यासाठी दररोज किमान १०० लिटरच इंधनाची गरज असते.
चारचाकीवाल्यांना आता ४० रुपये
दिवाडी- जुने गोवे, सांपेद्र-दिवाडी, रासई- दुर्भाट, केरी- तेरेखोल, पणजी-बेती, वाशी- आमई, कामुल तुयें या फेरीबोटीही नेहमीच व्यस्त असतात. मडकई- कुठ्ठाळी फेरीबोटीतून अनेक वाहनधारक वास्कोत कामा, धंद्याला जाण्याठी प्रवास करीत असतात. या वाहनधारकांना फटका बसेल. बेटांवर राहणाऱ्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जाणायांना चारचाकीसाठी ये-जा करतानाचे ८० रुपये तिकीट मोजावे लागेल.
नदी परिवाहन खात्याने फक्त १५० रुपये शुल्क आकरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांना महिन्याचा पास दिला जाणार आहे. यातून ते किती वेळाही प्रवास करा शकतात. आम्ही दुचाकीवाल्यांकडून मोठी रक्कम आकारलेली नाही. - मंत्री सुभाष शिरोडकर, नदी परिवाहन खाते.