गोव्यात येत्या १५ पासून १६०० कोटींची वीज कामे; साळगांव वीज उपकेंद्रासाठी येत्या महिन्यात पायाभरणी
By किशोर कुबल | Published: October 11, 2023 08:54 PM2023-10-11T20:54:20+5:302023-10-11T20:56:08+5:30
- २१ रोजी वेर्णा ६३ एमव्हीए ट्रान्स्फॉर्मरचे उद्घाटन, २३ रोजी मांद्रे वीज उपकेंद्राचे उद्घाटन
किशोर कुबल, पणजी : गोव्यात नवरात्रौत्सवाचा मुहूर्त धरुन येत्या १५ पासून राज्यात १६०० कोटी रुपये खर्चाची वीज कामे सुरु केली जातील. २१ रोजी वेर्णा ६३ एमव्हीए ट्रान्स्फॉर्मरचे उद्घाटन केले जाईल. २३ रोजी मांद्रे वीज उपकेंद्राचे उद्घाटन होईल तसेच साळगांव उपकेंद्रासाठी पायाभरणी येत्या महिन्यात केली जाईल.
पत्रकार परिषदेत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले कि, कोणतीही दरवाढ न करता २० टक्के अतिरिक्त महसूल खात्याला मिळाला आहे. ४०० कोटी रुपये महसूल आला आहे. १२ कोटींच्या वेर्णा ६३ एमव्हीए ट्रान्सफॉर्मरमुळे कुठ्ठाळी, दाबोळी, वास्को, बाणावली, लोटली, फातोर्डा भागातील वीज समस्या दूर होईल.
१५ रोजी मयें व साखळी तसेच चोडण व कारापूर येथे ३० कोटींची कामे चालू केली जातील. १६ रोजी पणजी, ताळगांव, सांताक्रुझ, सांत आंद्रे मतदारसंघांमध्ये ७० कोटींची, २१ रोजी फातोर्डा येथे ४० कोटींची तसेच वास्कोत ३० कोटींची, २२ रोजी बाणावली, वेळ्ळी, मडगांव, केपें, कुडचडें व पंचवाडी मिळून २०० कोटींपेक्षा अधिक रकमेची कामे सुरु केली जातील.
२३ रोजी मांद्रे वीज उपकेंद्राचे सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्र्यांहस्ते उद्घाटन केले जाईल. दसरा सण व त्यानंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यामुळे २ नोव्हेंबरपर्यंत पायाभरणी किंवा उद्घाटनाचा कार्यक्रम नाही. काणकोणात २०० कोटींची तर केपेंतील काही भागात ६० कोटींची कामे हाती घेतली जातील.
संपूर्ण बार्देस व पेडणे तालुक्यांसाठी वरदान ठरणार असलेल्या ३०० कोटींच्या साळगांव वीज उपकेंद्रासाठी वर्क ॲार्डर दिली असून येत्या महिन्यात मुख्यमंत्र्यांहस्ते पायाभरणी होईल. ढवळीकर म्हणाले की, यामुळे कळंगुट किनारपट्टीत पर्यटन व्यावसायिकांनाही दिलासा मिळेल.
राज्यभरात ७० कोटी रुपये खर्चुन २०० ट्रान्सफॉर्मर्स उभारले जातील. ढवळीकर म्हणाले की, ‘वीज सुधारणेसाठी अनेक कामे हाती घेतली आहेत.
पत्रकार परिषदेस वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस तसेच खात्याचे वरिष्ठ अभियंता उपस्थित होते.