राज्यातील १८ सहकारी पतसंस्थांनी लोकांचे २० कोटीपेक्षा जास्त पैसे बुडवले : विजय सरदेसाई

By समीर नाईक | Published: July 16, 2024 04:36 PM2024-07-16T16:36:13+5:302024-07-16T16:37:31+5:30

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून लोकांना त्यांचे पैसे मिळवून द्यावेत, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली.

18 co operative credit societies in the state have lost more than 20 crores of people s money Vijay Sardesai | राज्यातील १८ सहकारी पतसंस्थांनी लोकांचे २० कोटीपेक्षा जास्त पैसे बुडवले : विजय सरदेसाई

राज्यातील १८ सहकारी पतसंस्थांनी लोकांचे २० कोटीपेक्षा जास्त पैसे बुडवले : विजय सरदेसाई

पणजी : राज्यातील अनेक सहकारी पतसंस्थांनी हजारो लोकांचे कोट्यवधी रुपये बुडवले आहेत. एका अहवालानुसार, सुमारे १८ सहकारी पतसंस्थांनी २० कोटीपेक्षा जास्त पैसे बुडवल्याचे समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे यात पतसंस्थांचे व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. लोकांनी तक्रार करूनही कारवाई झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून लोकांना त्यांचे पैसे मिळवून द्यावेत, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली.

आज, अधिवेशनावेळी शून्य तासाच्या कामकाजावेळी ते बोलत होते. मार्शेल महिला को - ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने ग्राहकांचे जवळपास १८ कोटी रुपये बुडविले आहेत. डिचोली, आमोणा, मार्शेल यांसारखे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघाजवळील लोकांचेच पैसे यात अडकून पडले आहेत. या लोकांनी जुलै २०२१मध्ये याबाबत तक्रार नोंद केली होती. परंतु, आता जवळपास तीन वर्षे होऊनही कुठलीच कारवाई झालेली नाही. पोलिसांनी नंतर हे प्रकरण इकोनॉमिक सेलकडे पाठवले होते, तरीही कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. मी जेव्हा डिचोलीत जनता दरबार भरवला होता, तेव्हा या लोकांनी माझ्याशी संवाद साधला होता. त्यामुळे याबाबत त्वरित पावले उचलण्यात यावीत, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.

मार्शेल महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीव्यतिरिक्त गोवा राज्य मार्केटिंग अँड सप्लाय फेडरेशन यांनी सुमारे १ कोटी ९० लाख रुपये, फोंडा येथील थ्रिफ्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांनीदेखील लोकांचे १ कोटी २० लाख रुपये खाल्ले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये या सोसायट्यांचे पदाधिकारी, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. ज्या लोकांचे पैसे अडकून पडले आहेत, ते बहुतांश ज्येष्ठ नागरिक आहेत, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

आतापर्यंत सुमारे ६ नोंदणीकृत पतसंस्थांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. याव्यतिरिक्त इतर काही पतसंस्था आहेत, ज्या या गैरमार्गाने चालत आहेत. पतसंस्थांसंबंधीत जे कायदे आहेत, ते गुंतागुंतीचे आहेत. त्यामुळेच हा विषय हाताळण्यास वेळ लागत आहे. पण, यात लक्ष घालून ही प्रकरणे फास्टट्रॅक करण्याची सूचना करण्यात येईल, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी दिले.

Web Title: 18 co operative credit societies in the state have lost more than 20 crores of people s money Vijay Sardesai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा