दाम्पत्याने नोकरीसाठी गमावले १८.५ लाख; उमा व शिवम पाटीलवर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2024 11:54 AM2024-11-17T11:54:36+5:302024-11-17T11:57:44+5:30
वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक कपिल नायक यांनी सांगितले की, शनिवारी संशयित उमा आणि शिवम यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा नोंद केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : संशयित उमा पाटील आणि तिचा मुलगा शिवम पाटील यांनी आणखी एकाची फसवणूक केल्याचे शनिवारी (दि. १६) उघडकीस आले. आल्त-दाबोळी येथे राहणाऱ्या गीतेश नाईक आणि त्यांची पत्नी सोनाली यांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून दोघांनी १८ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याबद्दल दोघाही संशयितांवर गुन्हा दाखल केला. संशयितांविरुद्ध भादंसं ४२० आर डब्ल्यू ३४ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.
वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक कपिल नायक यांनी सांगितले की, शनिवारी संशयित उमा आणि शिवम यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा नोंद केला आहे. संशयितांनी गीतेश गोपाळ नाईक याला वाहतूक खात्यात (आरटीओ) आणि त्याची पत्नी सोनाली यांना वीज खात्यात नोकरीचे आमिष दाखवून १८ लाख ४५ हजार रुपयांची मागणी केली. नोकरी मिळेल या आशेने दाम्पत्याने ) संशयितांना १८ लाख ४५ हजार रुपये दिले. २ नोव्हेंबर २०२० ते अलीकडे काही दिवसांपर्यंत हा पैशांचा व्यवहार झाला. नोकरी मिळाली नसल्याने आई, मुलाने आपली फसवणूक केल्याचे गीतेश यांच्या लक्षात आले. त्यांनी वास्को पोलिस स्थानकात तक्रार दिली.
नव्या गुन्ह्यात अटक
शनिवारी उमा आणि शिवम यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. मात्र, वास्को पोलिस स्थानकावर नोंदवलेल्या दुसऱ्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या उमा पाटीलला पुन्हा अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी दिली.