रोस्टरमुळे अडली 182 शिक्षकांची भरती; 8 दिवसांत शिक्षक देऊ, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 01:06 PM2019-07-22T13:06:29+5:302019-07-22T13:06:37+5:30
एक वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेली प्राथमिक शिक्षकांची भरती का रखडली गेली याचे उत्तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासाला दिली.
पणजीः एक वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेली प्राथमिक शिक्षकांची भरती का रखडली गेली याचे उत्तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासाला दिली. शिक्षकांच्या भरतीसाठी गुणवत्ता यादी तयार केल्यानंतर राखीव कोट्याचा (रोश्टरचा )प्रश्न निर्माण झाला आणि त्यामुळे शिक्षक भरती रखडली होती असे त्यांनी सांगितले.
अनुसूचित जाती जमाती, माजी सैनिक आणि इतर काही राखीव वर्गासाठी उमेदवार उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे गुणवत्ता यादी तयार करूनही शिक्षकांची नियुक्ती करणे शक्य झाले नाही. त्यामुळे सरकारकडून हा प्रस्ताव आता सर्व खात्यांकडे पाठविला जाईल आणि सर्व खात्यांची मंजुरी घेतल्यानंतर शिक्षकांची नियुक्ती केली जाईल. येत्या 8 दिवसांत ही नियुक्ती केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
काही प्राथमिक विद्यालयात शिक्षक कमी आहेत याची सरकारला जाणीव आहे, परंतु प्राथमिक विद्यालयात शिक्षकांची उणीव भासू नये यासाठी सर्व प्रकारची खबरदारी सरकारकडून घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. पँरा शिक्षक नेमण्यात आले आहेत तसेच इंग्रजी विषयाचे शिक्षक ही ही उणीव भरून काढत आहेत असे त्यांनी सांगितले.