गोव्यात आमदारांच्या पेन्शन, भत्तेवाढीचा तिजोरीवर वर्षाकाठी १९ कोटी अतिरिक्त भार
By किशोर कुबल | Published: August 24, 2023 07:53 PM2023-08-24T19:53:37+5:302023-08-24T19:53:53+5:30
कायदा दुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी राज्यपालांकडे!
पणजी : गोव्यात मंत्री, आमदारांना पेन्शन, भत्तेवाढीचा वर्षाकाठी १९ कोटी ४६ लाख रुपये अतिरिक्त भार तिजोरीवर पडणार आहे.
आधीच राज्य सरकारची आर्थिक स्थिती बिकट आहे. सरकारने आणखी १०० कोटींचे रोखे खुल्या बाजारात विक्रीस काढले आहेत. अशा परिस्थितीत आमदारांना पेन्शन, भत्त्यांमध्ये भरमसाट वाढ केल्याने लोकांमध्ये नाराजी आहे.
७० हजारांवरुन पेन्शन ७५ हजार रुपये केली आहे. वार्षिक ४ हजार रुपये वाढ होणार आहे. कार खरेदीसाठी कर्ज १५ लाख रुपयांवरुन ४० लाख, घर खरेदीसाठी कर्ज मर्यादा ३० लाखांवरून ४५ लाख रुपये, पेट्रोल किंवा डिझेल दरमहा ३०० लिटरवरून ५०० लिटर केले आहे. आमदार स्वतःसाठी पाच कर्मचाऱ्यांऐवजी आता सात कर्मचारी दिमतीला घेऊ शकतील. सभापतींसाठी वैद्यकीय भत्ता ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आला आहे.
कायदा दुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी राज्यपालांकडे!
१० ॲागस्ट रोजी विधानसभेत संमत केलेले आमदार वेतन, भत्ते, पेन्शन दुरुस्ती विधेयक राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवले आहे. ते मंजूर होऊन येताच अधिसूचना जारी केली जाईल.