खासगी विद्यालयात शारिरीक शिक्षणाच्या शिक्षकाकडूनच २ विद्यार्थिनीचा विनयभंग
By आप्पा बुवा | Published: August 28, 2023 08:18 PM2023-08-28T20:18:15+5:302023-08-28T20:23:20+5:30
आर जे पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीने आरोपी शिक्षकाविरुद्ध शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.
फोंडा - फोंडा तालुक्यात एका खासगी विद्यालयात शारीरिक शिक्षकाने शाळेतील दोन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडल्यामुळे खळबळ माजली आहे. मुख्य म्हणजे सदरची घटना एक महिन्यापूर्वी घडली होती परंतु शाळा व्यवस्थापनाने यासंदर्भात कोणतीच तक्रार न दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सोमवारी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सदर गुन्ह्याला वाचा फोडली व म्हार्दोळ पोलिस स्थानकात रीतसर तक्रार दाखल केली आहे.
आर जे पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीने आरोपी शिक्षकाविरुद्ध शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. तक्रार देऊनही सदर शिक्षकावर कोणतेच कारवाही होत नाही ते पाहून पीडित मुलगी प्रचंड मानसिक आघातातून जात होती. परिणामी तिने शाळेत जाणे बंद केले. त्याच शाळेत तिची धाकटी बहीण सुद्धा जाते. सदर घटनेची धास्ती घेऊन तिने सुद्धा नंतर शाळेत जाणे बंद केले.
आरजी पक्षाचा पाठिंबा मिळताच सदर मुलीच्या पालकांनी पोलीस स्थानकात सोमवारी रीतसर तक्रार दाखल केली आहे. मुख्य म्हणजे एवढे सगळे होऊनही सदर शिक्षक अजूनही शाळेत शिकवत आहे. असे आरजीपी नेते विश्वेश नाईक यांनी सांगितले.
सरकार बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा देते, पण प्रत्यक्षात लहान मुलीवर अत्याचार होत असताना सरकार काहीही करत नाही. सदर शिक्षकावर योग्य ती कारवाई न झाल्यास शाळेवर मोर्चा नेऊ, असा इशारा विश्वेस नाईक यांनी दिला आहे. रेवोल्युशनरी गव्हर्नन्स पक्षाचे नेते म्हणतात त्याप्रमाणे परीक्षेच्या दिवसात सदर मुलगी मागच्या बाकावर बसून पेपर सोडवत होती. नेमके त्याचवेळी सदर शिक्षकाने सदर मुलीचा विनयभंग केला. सदरची बाब त्या मुलीने अन्य एका शिक्षिकेला सांगितली पण एक महिना झाले तरी अजून काहीही झाले नाही.
आर जी पक्षाचे नेते विश्वेश नाईक, प्रेमानंद नाईक, शैलेश नाईक यांच्यासह स्थानिकांनी सोमवारी पोलीस स्थानकात मोठी गर्दी केली.
पीडितेला न्याय मिळेपर्यंत हा लढा लढणार असल्याचा इशारा आरजी नेत्यानी पोलिसांना दिला आहे.