वेर्णा औद्योगिक वसाहतीत समोसे विकणाऱ्याकडून 2 किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 02:23 PM2021-01-06T14:23:50+5:302021-01-06T14:23:55+5:30
सदर संशयिताकडून हे अमली पदार्थ कसे आले आणि मागची किती वर्षे तो या व्यवसायात आहे याची चौकशी सद्या पोलीस करत आहेत.
मडगाव: एकाबाजूने गोव्यात सरकार पुरस्कृत गांजा लागवड करण्याचा प्रस्ताव पुढे येत असताना दुसऱ्या बाजूने गोव्यात अगदी समोसे विकणाऱ्याकडेही गांजा उपलब्द होऊ शकतो ही गोष्ट उघड झाली आहे. वेर्णा औद्योगिक वसाहतीत ठेला लावून समोसे विकणाऱ्या झारखंडच्या एका इसमाला मंगळवारी पोलिसांनी अटक केली असता त्याच्या कडे चक्क 2 किलो गांजा सापडला.
दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकज कुमार सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव सोनू कुमार नाईक(38) असे असून त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत 2.10 लाख एव्हढी आहे.सदर संशयित मागची 20 वर्षे गोव्यात राहत असून वेर्णा औद्योगिक वसाहतीत चहा आणि समोसे विकण्याचा गाडा तो चालवायचा.
मंगळवारी सायंकाळी वेर्णा येथील वालादारीस हॉल या निर्जन जागेकडे तो माल घेऊन येणार याची सुलुस पोलिसांना लागल्यावर त्यांनी तिथे सापळा रचून त्याला अटक केली. सदर संशयिताकडून हे अमली पदार्थ कसे आले आणि मागची किती वर्षे तो या व्यवसायात आहे याची चौकशी सद्या पोलीस करत आहेत.