कळंगुट येथे २ लाख रूपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 08:17 PM2018-01-09T20:17:00+5:302018-01-09T20:19:14+5:30
कळंगुट परिसरात पोलिसांकडून अमली पदार्थ जप्त करण्याचे सत्र सुरूच आहे. आज मंगळवारी पहाटे पोलिसांनी मूळ हिमाचल प्रदेश नागरिकाकडून २ लाख रूपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त केला आहे.
म्हापसा - गोव्यातील कळंगुट परिसरात पोलिसांकडून अमली पदार्थ जप्त करण्याचे सत्र सुरूच आहे. आज मंगळवारी पहाटे पोलिसांनी मूळ हिमाचल प्रदेश नागरिकाकडून २ लाख रूपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार गावरावाडा - कळंगुट येथील एका रेस्टॉरेंटात स्वयंपाकी म्हणून कामाला असलेला तरुण सुनिल कुमार (वय २२) हा अमली पदार्थाची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती त्यांनी प्राप्त झाली. लागलीच त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक स्थापन करुन सापळा रचण्यात आला. रचलेल्या सापळ््यात तो अलगद अडकला. मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली व त्याला चरस व गांजा सहित ताब्यात घेण्यात आले.
कारवाईवेळी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ १ लाख ४० हजार रुपये किमतीचा चरस व ५५ हजार रुपये किमतीचा गांजा सापडला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत १ लाख ९५ हजार रुपयांची आहे. ग्राहकाच्या प्रतिक्षेत असताना ही कारवाई करण्यात आल्याचे ते म्हणाले.
त्याला अटक करुन त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करुन त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली. निरिक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक आर पाटिल, उपनिरिक्षक सिताराम मळीक, कॉन्स्टेबल प्रवीण महाले, दिनेश मोरजकर, गोविंद शिरोडकर, वल्लभ पेडणेकर या पोलीस पथकाने ही यशस्वी कारवाई केली. याप्रकरणी पूढील पोलीस तपास सुरु आहे. कळंगुट पोलिसांनी नविन वर्षात अमली पदार्था विरोधात केलेली ही पहिलीच कारवाई आहे. मागील वर्षभरात एकूण ३१ गुन्हे पोलिसांनी नोंद केले होते. सध्या सुरू असलेली ही मोहिम पुढे आणखिन कडक करण्यात येणार असल्याची माहिती दळवी यांनी दिली.