७२ योजनांसाठी २ हजार कोटींचे प्रस्ताव; लिलाव केलेल्या खाणी सुरु करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 12:53 PM2023-08-29T12:53:18+5:302023-08-29T12:54:35+5:30
गांधीनगर, गुजरात येथे आयोजित पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीवेळी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजीः केंद्र पुरस्कृत विविध योजनांतर्गत राज्यासाठी अधिकाधिक निधी आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. २ हजार १९६ कोटी ६५ लाख रुपयांच्या ७२ योजनांशी संबंधित प्रस्ताव केंद्र सरकारने विविध मंत्रालयांना सादर केले आहेत. तसेच राज्यातील लिलाव केलेल्या खाणी लवकर कार्यान्वित करण्याबाबत केंद्राशी चर्चा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
गांधीनगर, गुजरात येथे आयोजित पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीवेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री तथा पश्चिम विभागीय परिषदेचे अध्यक्ष अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दमण, दीव आणि दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक प्रफुल्ल पटेल व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, पोर्तुगिजांच्या तावडीतून गोवा मुक्त होऊन ६१ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात गोव्याने अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रांमध्ये वाढ अनुभवली आहे. गोवा सरकार हे अंत्योदय, ग्रामोदय आणि सर्वोदय तत्त्वांवर कार्य करीत आहे. समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत योजना पोहोचाव्यात, कुणीही वंचित राहू नये, शाश्वत विकास हेच राज्याचे ध्येय आहे.
केंद्र सरकारचे पाठबळ मिळेल
केंद्र सरकारच्या पाठिंब्यांशिवाय राज्याची प्रगती साधणे अशक्य आहे. गोवा हे लहान राज्य असले तरी केंद्राने गोव्याला नेहमीच सहकार्य केले आहे. यासाठी गोव्याची जनता कृतज्ञ आहे. गोव्याने आपल्या सर विकासाचे ध्येय ठेवले असून त्यासाठी राज्याला, केंद्रीय मंत्रालयांकडून पाठबळ आवश्यक असून ते मिळेल, याची खात्री असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.