पर्रीकर मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू, काब्राल व मिलिंद नाईक नवे मंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 11:46 AM2018-09-24T11:46:54+5:302018-09-24T11:47:42+5:30
कुडचडेचे आमदार निलेश काब्राल आणि मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांचा नवे मंत्री म्हणून राजभवनवर शपथविधी होणार आहे.
सदगुरू पाटील
पणजी - गेले तीन महिने रुग्णालयात उपचार घेत असलेले पांडुरंग मडकईकर व फ्रान्सिस डिसोझा या दोन्ही आजारी नेत्यांना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी (24 सप्टेंबर) भाजपा पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनंतर मंत्रिमंडळातून वगळले आहे. कुडचडेचे आमदार निलेश काब्राल आणि मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांचा नवे मंत्री म्हणून राजभवनवर शपथविधी होणार आहे.
पर्रीकर हे स्वत: दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. तथापि, पुढील लोकसभा निवडणुका गोव्यात भाजपाला जिंकायच्या असतील तर आजारी मंत्र्यांना डच्चू देणे गरजेचे आहे हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या लक्षात आले. शहा यांनी यापूर्वी गोव्यात रामलाल, बी. एल. संतोष व विजय पुराणिक हे तीन निरीक्षक पाठवले होते. त्यांनीही गोव्यातील वस्तूस्थिती शहा यांच्यासमोर ठेवली. तसेच केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर व भाजपा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनीही शहा यांच्यासमोर अहवाल मांडला होता.
पर्रीकर हेही आजारी असले तरी, त्यांच्याकडील नेतृत्व काढून घेतले तर, गोव्यात सरकार कोसळेल याची कल्पना भाजपाच्या श्रेष्ठींना आली. त्यामुळे पर्रीकर यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद ठेवले गेले आहे. गेल्या मार्चमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी पांडुरंग मडकईकर हे कुंभारजुवे मतदारसंघातून निवडून आले होते. ते प्रथमच भाजपाच्या तिकीटावर लढले होते. ते वीजमंत्री झाले होते पण त्यांनी गेल्या जूनमध्ये ब्रेन स्ट्रोक आला व त्यामुळे मुंबईच्या रुग्णालयात दाखल करावे लागले. तिथून ते अजूनही परतलेले नाहीत. मिलिंद नाईक हे पूर्वीच्या भाजपा सरकारमध्ये वीजमंत्री होते. नाईक यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिले जात आहे. काब्राल हे कधीच मंत्री झाले नव्हते. ते आता प्रथमच मंत्री होत आहेत. काब्राल व नाईक हे दोघेही दक्षिण गोव्यातील आहेत. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ आता भाजपासाठी मजबूत झाल्याचे भाजपाला वाटते.
दरम्यान, आपल्याला मंत्रिमंडळातून वगळले जात असल्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी फोनवरून सोमवारी सकाळी सांगितले, असे अमेरिकेत उपचार घेणारे फ्रान्सिस डिसोझा यांनी लोकमतला सांगितले. आपल्याला वगळले म्हणून आपली काही हरकत नाही. दोन महिन्यांनी पुन्हा स्थितीचा आढावा घेऊ, असे पर्रीकर यांनी आपल्याला सांगितले. दोघांना मंत्रिमंडळातून वगळावे हा भाजपा श्रेष्ठींचा निर्णय असल्याचे पर्रीकर यांनी सांगितल्याचं डिसोझा म्हणाले.