गोवा फॉरवर्डचे २0 उमेदवार सप्टेंबर अखेरपर्यंत जाहीर
By admin | Published: August 19, 2016 02:08 AM2016-08-19T02:08:18+5:302016-08-19T02:12:17+5:30
पणजी : गोवा फॉरवर्ड पक्ष आपले २0 उमेदवार सप्टेंबरअखेरपर्यंत जाहीर करणार आहे. काँग्रेसबरोबर युतीचा पर्याय पक्षाने खुला ठेवला
पणजी : गोवा फॉरवर्ड पक्ष आपले २0 उमेदवार सप्टेंबरअखेरपर्यंत जाहीर करणार आहे. काँग्रेसबरोबर युतीचा पर्याय पक्षाने खुला ठेवला असून प्रमुख १२ प्रश्न घेऊन पक्ष जनतेच्या दरबारात जाणार आहे.
पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर तिंबले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाला अधिमान्यता दिल्यानंतर ही पहिलीच पत्रकार परिषद होती. तिंबलो म्हणाले की, सरकार जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर असंवेदनशील बनले आहे. विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीची हत्या केली. आमच्या आमदारांनी अनेक विषय मांडण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना बोलू दिले नाही.
रेड कॅटेगरीतील उद्योगांना पायघड्या घालून पर्यावरणाची हानी केली जात आहे. नद्यांचे राष्ट्रीयीकरण करून सरकार मच्छीमारांचा उदरनिर्वाह तसेच मत्स्यसंपत्ती नष्ट करायला निघाले आहे. कॅसिनो तसेच अमली पदार्थांना प्रोत्साहन दिले जात आहे. उद्योगधंद्यांमध्ये भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ हा घाऊक भू-रुपांतराचा अड्डा बनला आहे. वीज दर प्रचंड वाढविले आहेत. किनारा सफाई तसेच कचरा व्यवस्थापनात घोटाळे करण्यात आले आहेत. सरकार राज्याला कर्जाच्या खाईत लोटत असून १८ हजार कोटींचे कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे. शिक्षण माध्यमप्रश्नी राजकारण केले जात आहे. आणखी एक समिती स्थापन करून पुन्हा घोळ घातला आहे. सर्व मंत्रालयांमध्ये घोटाळे झाले आहेत. खाणी पूर्ण वेगाने सुरू होऊ शकलेल्या नाहीत. प्रादेशिक आराखड्याच्या प्रश्नावर जनतेची थट्टा चालवली आहे. हे १२ विषय घेऊन आम्ही आगामी निवडणुकीत जनतेच्या दरबारात जाऊ, असे तिंबले यांनी सांगितले.
पक्षाचे मुख्य प्रवक्ते प्रशांत नाईक म्हणाले, की हे सरकार व्हीप काढून अविश्वास ठराव जिंकते, पण आगामी निवडणुकीत जनतेच्या दरबारात साम, दाम, दंड भेद वापरला तरी जिंकू शकणार नाही. नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला विरोध करताना अदानी, अंबानी यांच्याकडे नद्या गहाण टाकायला सरकार निघाले आहे, असा आरोप त्यांनी केला. मच्छीमारांचा उदरनिर्वाह नष्ट होईल तसेच अंतर्गत जलवाहतुकीवरही निर्बंध येतील, असे ते म्हणाले. याबाबत वेगळ्या पद्धतीने आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला. पुढील दाराने राष्ट्रीयीकरण आणि मागील दाराने खासगीकरण असा हा डाव असल्याचा आरोप तिंबले यांनी केला. प्रवक्ते तन्वीर खतिब म्हणाले की, आगामी निवडणुकीसाठी पक्षाने रोड मॅप तयार केला असून सत्तेवर आल्यास पाव, मासळी व नारळ लोकांना सवलतीच्या दरात दिले जातील. (प्रतिनिधी)