गोव्यात 20 लाखांचे अंमलीपदार्थ जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 05:12 PM2019-04-03T17:12:44+5:302019-04-03T17:12:59+5:30
बुथवार मतदारांची यादी तपासली जात असून ज्यांच्याकडून काही अघटीत घटना घडण्याची शक्यता आहे त्या व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सुचनाही स्थानिक पोलिसांना करण्यात आल्या आहेत.
मडगाव: गोव्यात लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्र्वभूमीवर गोवा पोलिसांनी बेकायदेशीर दारु व्यवहारावर निर्बंध आणतानाच अंमलीपदार्थ व्यवसायाविरोधातही मोहीम उघडली आहे. मागच्या तीन आठवडय़ात गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी धाडी घालून 20 लाखांचे ड्रग्स पकडण्यात आले आहेत.
गोव्याचे पोलीस महानिरीक्षक परमादित्य यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, अशा व्यवहारावर निर्बंध यावेत यासाठी गोव्याच्या सीमेवरील गस्त वाढवली असून या सीमेवरुन आत येणाऱ्या वाहनांवर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेण्यात येत आहे. याशिवाय सीमेवरील आड वाटांवरही पोलीस गस्त ठेवण्यात आली आहे.
आतापर्यंत गोवा पोलिसांनी 20 लाखांचे अंमलीपदार्थ जप्त करण्याबरोबरच सुमारे अडीच कोटींची दारु पकडली आहे. त्याशिवाय मटक्यावरही आमची कारवाई चालू आहे. गोव्यातील अंमलीपदार्थ विरोधी पथकांसह वाहतूक, क्राईम ब्रँच, स्पेशल ब्रँच आणि स्थानिक पोलिसांचा त्यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतदान सुरळीत व्हावे यासाठी सर्व बुथवार मतदारांची यादी तपासली जात असून ज्यांच्याकडून काही अघटीत घटना घडण्याची शक्यता आहे त्या व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सुचनाही स्थानिक पोलिसांना करण्यात आल्या आहेत.