नवीन वर्षात गोव्याहून आंतरराज्य मार्गावर कदंबच्या 20 नव्या बसगाड्या धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 07:07 PM2017-12-27T19:07:55+5:302017-12-27T19:08:04+5:30
येत्या जानेवारी महिन्यापासून कदंब वाहतूक महामंडळाच्या वीस नव्या बसगाड्या आंतरराज्य मार्गावरून धावणार आहेत. महामंडळाने त्यासाठीची तयारी चालवली आहे.
पणजी : येत्या जानेवारी महिन्यापासून कदंब वाहतूक महामंडळाच्या वीस नव्या बसगाड्या आंतरराज्य मार्गावरून धावणार आहेत. महामंडळाने त्यासाठीची तयारी चालवली आहे.
कदंब महामंडळाच्या अनेक बसगाडय़ा जुन्या झाल्या आहेत. लाखो किलोमीटर त्या चालल्या आहेत. त्या बसगाडय़ा बाजूला काढून नव्या वीस बसगाडय़ा सुरू केल्या जातील, असे महामंडळाच्या अधिका-यांनी सांगितले. गोवा-सोलापूर अशा बससेवेला मागणी वाढली आहे. मोठय़ा संख्येने प्रवासी गोवा-सोलापूर असा प्रवास करतात. येत्या दि. 1 जानेवारीपासून गोव्याहून सोलापूरला कदंब वाहतूक महामंडळाची नवी लक्झरी बसगाडी पाठवली जाईल. सध्या देखील लक्झरी बसगाडीच सोलापुरला जाते पण ती जुनी झालेली आहे, असे अधिका-यांनी स्पष्ट केले. एकूण तीन लक्झरी बसगाडय़ा कदंब महामंडळाने तयार ठेवल्या आहेत. गोवा ते पुणो या मार्गावरही जास्त बससेवेसाठी मागणी वाढली आहे. प्रवाशांची संख्या वाढत आहे. अलिकडेच कदंब महामंडळाने पुणो मार्गावर स्लीपर बसगाडी सुरू केली आहे. आता जानेवारीपासून तिथे लक्झरी बसगाडी सुरू केली जाईल. गोवा ते सोलापूर व गोवा ते पुणो या दोन मार्गावर एकूण तीन लक्झरी बसगाडय़ा सुरू होतील, असे अधिका-यांनी स्पष्ट केले.
पणजी ते बेळगाव तसेच पणजी ते हुबळी, धारवाड, हम्पी अशा काही मार्गावरही कदंबच्या जुन्या बसगाडय़ा धावतात, त्या मागे घेऊन नव्या बसगाडय़ा तिथे सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे. काही बसगाडय़ा जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून तर काही जानेवारीच्या दुस-या पंधरवड्या बदलल्या जातील.
दरम्यान, कदंब वाहतूक महामंडळाच्या एरव्ही रोज ज्या बसगाडय़ा हुबळी व धारवाडला सकाळी जात होते, त्या बुधवारी दुपारी दोननंतर हुबळी व धारवाडला निघाल्या. उत्तर कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्ये म्हादई पाणी प्रश्नावरून कर्नाटकातील शेतक-यांकडून गुरुवारी सकाळी बंद पुकारला गेला होता. त्या बंदमुळे कदंबच्या बसगाडय़ा फोडण्यासारख्या दुर्घटना घडू नयेत म्हणून महामंडळाने काळजी घेतली व सकाळी बसेस सोडल्या नाहीत. हजारो प्रवासी त्यामुळे गोव्यात अडकून पडले पण दुपारी दोन वाजल्यानंतर कदंबच्या पंधरा ते वीस बसगाडय़ा हुबळी- धारवाडच्या बाजूने पाठविण्यात आल्याची माहिती अधिका-यांनी दिली.