आता २० विद्यार्थ्यांनाही मिळणार दोन शिक्षक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 11:34 AM2018-07-18T11:34:33+5:302018-07-18T11:45:12+5:30
गोव्यात दोन शिक्षकी शाळांचे नियम बदलले
वासुदेव पागी
पणजी: एक शिक्षकी शाळांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने शिक्षण खात्याने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दोन शिक्षकी शाळेसाठी किमान विद्यार्थ्यांची संख्या २० वर आणली असून या आधी ती २५ होती.
शिक्षण खात्याच्या या निर्णयामुळे राज्यातील बरीच प्राथमिक विद्यालये आहेत जी अवघ्या काही विद्यार्थ्यांमुळे दोन शिक्षकांना मुकत होती त्यांना आता दोन शिक्षक मिळणार आहेत. शिवाय एक शिक्षकी विद्यालयात मुलांना पाठवायलाही पालक खुश नसतात. या निर्णयामुळे दोन शिक्षकी शाळा वाढून विद्यार्थीही वाढतील अशी अपेक्षा शिक्षण खात्याला आहे.
शिक्षण संचालक गजानन भट यांनी या विषयी माहिती देताना २५ विद्यार्थ्यांच्या अटीमुळे अनेक ठिकाणी शाळेला दोन शिक्षक मिळविणे कठीण होते. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यालयात जिथे स्थलांतर व इतर कारणांमुळे विद्यार्थ्यांची आवश्यक संख्या मिळविणे कठीण असते त्या विद्यालयांसाठी हा नवीन निर्णय काही प्रमाणात दिलासा दायक ठरणार असल्याचं सांगितले.
यंदा सरकारी विद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे ९० एक शिक्षकी शाळांपैकी ४० शाळा या वर्षी दोन शिक्षकी झाल्या आहेत. केवळ ५० एक शिक्षकी शाळा राहिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या वाढलेल्या संख्येबरोबरच बदललेल्या नियमांचाही हा परिणाम असल्याची माहिती शिक्षण खात्याकडून देण्यात आली.
मराठी शाळेत विद्यार्थी वाढले
काणकोण, केपे, वाळपई आणि पेडणे तालुक्यात सरकारी प्राथमिक मराठी व कोंकणी माध्यमाच्या विद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या वाढली असल्याची माहिती शिक्षण खात्याकडून देण्यात आली. याविशयी माहिती देताना शिक्षण संचालक गजानन भट म्हणाले, ‘राज्यातील सर्व सरकारी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा ताजा संख्यापट अलिकडेच आम्हाला मिळाला आहे. चार तालुक्यात मराठी व कोंकणी माध्यमाच्या सरकारी प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचे आढळून आले आहे. विशेषत: मराठी माध्यमाकडे ओघ वाढतो आहे असे संकेत देणारी ही माहिती आहे. विठ्ठलापूर - साखली येथील सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ५० वरून ७९ वर गेली आहे. त्यामुळे नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यालयात उर्दू माध्यमाचा विभाग असल्याचे त्यांनी सांगितले.