2009मध्येच काढायचा होता दाभोलकरांचा काटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2016 07:52 PM2016-06-16T19:52:18+5:302016-06-16T20:53:30+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा डॉ. विरेंद्रसिंग तावडे व सारंग अकोलकर यांनी 2009 मध्येच काटा काढण्याचे ठरविले होते
ऑनलाइन लोकमत
गोवा, दि. 16 - मडगाव येथे ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा डॉ. विरेंद्रसिंग तावडे व सारंग अकोलकर यांनी 2009 मध्येच काटा काढण्याचे ठरविले होते; मात्र त्याचवेळी येथे बॉम्बस्फोट झाल्याने त्यांनी आपला हा कट पुढे ढकलला. ही माहिती सीबीआयच्या चौकशीत पुढे आली आहे. इकॉनॉमिक टाईम्सने सीबीआयच्या चौकशी अधिका:यांचा हवाला देऊन हे वृत्त प्रसिध्द केले आहे.
2009मध्ये दाभोलकरांचा काटा काढण्याचे कारस्थान शिजले होते; मात्र त्याचदरम्यान मडगावात बॉम्बस्फोट होऊन मलगोंडा पाटील व योगेश नाईक हे सनातनचे दोन साधक ठार झाल्याने त्यांनी हा कट रद्द केला, असा सीबीआयचा दावा आहे. त्यांनी आपला हा कट 20 ऑगस्ट 2013 रोजी प्रत्यक्षात आणला, असाही सीबीआयचा दावा आहे. मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सध्या फरार असलेल्या सारंग अकोलकरने मडगाव बॉम्बस्फोटाच्या दरम्यान तावडेशी आपल्या फोनवरून 25 वेळा संपर्क साधला होता, अशीही माहिती कॉल डिटेल्सवरून पुढे आली आहे. कान, नाक आणि घसा तज्ज्ञ असलेला डॉ. तावडे याचा सांगली- मिरज दंगलीतही समावेश होता, अशीही माहिती पुढे आली आहे. (प्रतिनिधी)
पुन्हा चौकशी करा : वाघ
डॉ. विरेंद्रसिंग तावडे याचा मडगाव बॉम्बस्फोटाशी संबंध होता की नाही याची एनआयएने पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी गोव्याचे उपसभापती विष्णू वाघ यांनी केली आहे.