२०२४ : लोकांप्रती बांधिलकी, उत्तम आरोग्य, स्वच्छ पर्यावरणाची प्रतिज्ञा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 08:04 AM2024-01-01T08:04:35+5:302024-01-01T08:05:41+5:30

गोव्याला आता आरोग्य सेवा आणि रोजगार निर्मितीमध्ये अव्वल कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये स्थान मिळाले आहे.

2024 commitment to people good health clean environment | २०२४ : लोकांप्रती बांधिलकी, उत्तम आरोग्य, स्वच्छ पर्यावरणाची प्रतिज्ञा

२०२४ : लोकांप्रती बांधिलकी, उत्तम आरोग्य, स्वच्छ पर्यावरणाची प्रतिज्ञा

विश्वजीत राणे

गोव्याला आता आरोग्य सेवा आणि रोजगार निर्मितीमध्ये अव्वल कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये स्थान मिळाले आहे. गोवा मॉडेलमध्ये लोकांच्या सर्वांगीण हितासाठी सामूहिक प्रयत्न आणि तंत्रज्ञानाची सांगड आहे.२०२३ मधील यश उल्लेखनीय आहे आणि २०२४ साठी, बांधिलकी नवीन पायंडा पाडणे आणि सर्व गोवासियांना आनंदी, समृद्ध जीवन सुनिश्चित करणे हे आहे.

आपण सर्वजण उज्ज्वल आणि समृद्ध भवितव्याची वाट पाहत असताना, गेल्या वर्षभरात गोव्याने केलेल्या प्रमुख कामगिरीची नोंद घेणे हा माझा विशेषाधिकार आहे. सर्वात वेगाने विकसनशील राज्यांपैकी एक म्हणून उदयास आलेले, गोवा राज्य येत्या वर्षात विशेषतः आरोग्य, शहरी विकास, महिला आणि बालविकास आणि वनीकरण क्षेत्रात आदर्श ठेवण्याच्या मार्गावर आहे.

लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि विकसित राज्यांच्या श्रेणीत पाऊल टाकण्यासाठी आरोग्य महत्त्वाची भूमिका बजावते, विविध आरोग्य आणि वैद्यकीय सेवा कार्यक्रमांद्वारे 'सर्वासाठी आरोग्य' हे उद्दिष्ट साध्य केल्यानंतर, २०२३ मध्ये गोवा हे मोफत आयव्हीएफ उपचार देणारे पहिले राज्य बनले. इच्छुक जोडप्यांना अनेक आयव्हीएफ सायकलसाठी उदंड खर्च करावा लागतो, परंतु, पालकत्व हा प्रत्येकाचा हक्क आहे हे मान्य करून, गोवा सरकार मोफत आयव्हीएफ उपचार देत आहे. नॅशनल प्रोग्रॅम फॉर पॅलिएटिव्ह केअरच्या अनुषंगाने प्राथमिक स्तरावरील रुग्णांना मदत करण्यासाठी राज्याने फॅमिली पॅलिएटिव्ह केअर प्रणाली सुरू केली आहे. 

गोवा स्ट्रोक कार्यक्रमात आणखी एक अभिनव उपक्रम या वर्षी दिसला, जो गोवा आरोग्य सेवा संचालनालय (DHS) आणि गोमेकॉमधील न्यूरोलॉजी विभाग यांनी संयुक्तपणे जानेवारी २०२३ मध्ये सुरू केला. त्यात ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांना मदत करण्याची सोय आहे. लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना ६० मिनिटांच्या 'गोल्डन अवर'मध्ये आणले जाते आणि जीवरक्षक इंजेक्शनने थ्रोम्बोलायझेशन केले जाते. १०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे जोडलेली प्रमुख रुग्णालये ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहेत. संपूर्ण उपचार मोफत आहे.

२०१८ मध्ये गोवा सरकारने सुरू केलेला STEMI कार्यक्रम, टेलि-ECG निदान, थ्रोम्बोलिसिस, आपत्कालीन प्रकरणांचे उपचार केंद्रांमध्ये जलद हस्तांतरण आणि गंभीर सुवर्णकाळात प्रभावीपणे जीव वाचवण्याची सुविधा देते. गोव्यातील १०८ रुग्णवाहिका सेवांमध्ये कार्डियाक केअर रुग्णवाहिका जोडणे ही आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, जी भारतातील पहिलीच आहे.

कर्करोगाच्या चांगल्या उपचारांसाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटलसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे आणि TMH मधील डॉक्टरांसोबत कर्करोग उपचार ओपीडी सुरू झाल्या आहेत. २०२३ हे बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून चिन्हांकित करण्यासाठी, गोमेकॉ आणि सोडेक्सोने बाजरीच्या आहारासह पौष्टिक जेवण देण्यासाठी बाजरी-आधारित अन्न योजना 'आरोग्यम' सादर केली.

हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, आरोग्य विभागाने सार्वजनिक ठिकाणी CPR प्रशिक्षण आणि AED उपकरणे बसविण्याचा कार्यक्रम सुरू केला. हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद वेळेत वेग वाढवणे आणि मृत्यू दर कमी करणे हा यामागचा उद्देश आहे.

आरोग्य विभाग आणि महिला व बाल विभाग यांनी यावर्षी संयुक्तपणे राज्यात आयुष्मान भारत आरोग्य खाते (ABHA) क्रमांकाची निर्मिती सुरू केली आहे. यामुळे एखाद्याच्या आरोग्याच्या नोंदी डिजिटल पद्धतीने सामायिक करणे शक्य होईल आणि पंतप्रधानांच्या डिजिटल इंडिया मिशनला पुढे नेले जाईल. WCD ने DHS सोबत संयुक्तपणे आरोग्य आणि पोषण विषयक जागरूकता कार्यक्रम देखील सुरू केला. ज्यामध्ये अंगणवाडी सेविका, मुलांमधील कुपोषणावर उपचार करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला महिला सक्षमीकरणाचा उत्साहपूर्ण सोहळा आयोजित करण्यात आला होता. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी सुमारे ७०० अतिरिक्त बचत गट जोडण्यात आले. वन विभागाने कॅम्पिंग साइट्स वाढवण्यावर भर देण्याचं ठरवलं आहे. नवीन वर्षात पोर्टेबल टेंटसाठी तंबू प्लॅटफॉर्म, लॉग हट्स, ट्रीहाऊस, कॉटेज आणि वसतिगृहे यासह अनेक पर्याय दिसतील. अभयारण्यांचे संरक्षण करण्यासाठी उच्च-रिझोल्यूशन ड्रोन वापरण्यात आले आहेत.

नवीन वर्षात पाऊल ठेवत असताना, एक स्वस्थ राष्ट्र निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून, मन की बातच्या १०८ व्या भागामध्ये पंतप्रधान मोदींनी मांडलेल्या व्हिजनचा स्वीकार करण्याचे माझे ध्येय आहे. सर्वांसाठी एक मजबूत आणि लवचिक आरोग्य सेवा प्रणालीच्या ध्येयासाठी प्रयत्न सुरू आहेत. या दिशेने आमचे प्रयत्न २०२४ मध्ये अधिक मजबूत होतील, जिथं आम्ही फिटनेस आणि आरोग्याचे वर्ष बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. गोवा हे आरोग्यदायी आणि आनंदी ठिकाण बनवण्यासाठी इतर अनेक उपक्रम येत्या वर्षभरात सुरू केले जातील.

(लेखक गोवा सरकारात आरोग्य, शहरी विकास, महिला व बालकल्याण आणि वन मंत्री आहेत.)

 

Web Title: 2024 commitment to people good health clean environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.