नाताळ नववर्षानिमित्त समुद्र किनारी जीवरक्षकांचा २४ तास पहारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 05:33 PM2023-12-23T17:33:15+5:302023-12-23T17:33:48+5:30
सुरक्षतेच्या कारणामुळे दुप्पट जीवरक्षक असणार
नारायण गावस, पणजी (गोवा): नववर्ष तसेच नाताळ यामुळे राज्यातील समुद्र किनारी पर्यटकांची संख्या वाढत आहेत. सर्वच समुद्र किनारे सध्या हाऊसफुल झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी दृष्टी या लाईफ गार्ड कंपनीने जीवरक्षकांची तैनात आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी नाताळ असल्याने जीवरक्षक दिवसरात्र सर्वच समुद्र किनाऱ्यांवर पहारा ठेवणार आहे. त्यांची संख्याही वाढविली जाणार आहे. तसेच ३१ डिसेंबर रात्री सर्वच समुद्र किनाऱ्यांवर गर्दी असते त्यामुळे जीवरक्षक दिवस रात्र तैनात असणार आहे. कुठलाच अनुसुचित प्रकार घडू नये यासाठी दृष्टी जीवरक्षक कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
मागील काही दिवसांपासून समुद्र किनारी पर्यटकांचा बुडून मरण्याच्या घटना वाढत आहेत. अनेक पर्यटक दारु पिउन समुद्र किनारी धांगडधिंगा घालतात. नियमांचे पालन करत नाहीत खोल समुद्रात आंघाेळीसाठी जातात. अशा अनेक बुडणाऱ्या पर्यटकांना जीवरक्षकांनी वाचविले आहे. आता नवीन वर्ष व नाताळ असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक गाेव्यात दाखल झाले आहेत. ते समुद्र किनारी असे दारु पिउन मस्ती करतात. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी जीवरक्षक माेठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत.
गोव्यातील समुद्र किनारे हे जागतिक पर्यटनाचे आकर्षण आहे. देश विदेशातील पर्यटक गोव्यात नाताळ तसेच नवीन वर्षे साजरे करण्यासाठी येत असतात. नवीन वर्षात तसेच नाताळाला सर्व समुद्र किनारी पार्ट्या आयोजित केल्या जातात. या पार्ट्यांमध्ये माेठ्या प्रमाणात दारुचे प्राशन केले जाते. रात्रभर पर्यटक समुद्र किनारी पार्ट्यांचा आस्वाद घेतात. अशा वेळी पर्यटक बुडून मृत्यू होउ नये यासाठी दृष्टी जीवरक्षक लक्ष ठेवणार आहे.