बस दुचाकी अपघातात २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 10:32 PM2019-12-19T22:32:28+5:302019-12-19T22:32:28+5:30
उत्तर गोव्यातील आगशी ‘बायपास’ महामार्गावर दुचाकी व बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बिठ्ठोण येथील २४ वर्षीय ऋषीकेश नाईक या तरुणाचा मृत्यू झाला.
वास्को: गुरूवारी (दि.१९) दुपारी उत्तर गोव्यातील आगशी ‘बायपास’ महामार्गावर दुचाकी व बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बिठ्ठोण येथील २४ वर्षीय ऋषीकेश नाईक या तरुणाचा मृत्यू झाला. अपघाता वेळी ऋषीकेश नाईक याच्या दुचाकीमागे बिठ्ठोण येथील अनिश शेट नावाचा २१ वर्षीय तरुण प्रवास करत असून या अपघातातून सुदैवाने तो फक्त किरकोळ जखमा होऊन सुखरूप बचावला. ऋषीकेश व अनिश प्रवास करत असलेल्या दुचाकीला धडक दिल्यानंतर त्या अज्ञात बसचालकाने बससहीत घटनास्थळावरून पोबारा काढला असून आगशी पोलीस त्याच्या विरुद्ध ‘हीट अॅण्ड रन’ चे प्रकरण नोंद केले आहे.
आगशी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक योगेश गडकर यांनी दिलेल्या माहीतीनुसार गुरूवारी दुपारी २.१० च्या सुमारास सदर अपघात घडला. बिठ्ठोण येथे राहणारा ऋषीकेश
व त्याचा साथीदार अनिश हे दोघेही तरुण ‘फसीनो’ दुचाकीवरून जात होते. जेव्हा ते आगशी बायपास रस्त्यावर पोचले त्यावेळी त्यांना एका अज्ञात बसने धडक दिल्यानंतर अज्ञात बसचालकाने बससहीत घटनास्थळावरून पोबारा काढला. दुचाकीला धडक दिल्याने ऋषीकेश व अनिश रस्त्यावर फेकले जाऊन यात ऋषीकेश गंभीर जखमी झाला. सदर अपघात घडल्यानंतर दोघांना त्वरित उपचारासाठी इस्पितळात नेण्यात आले, मात्रे येथे पोचण्यापूर्वीच ऋषीकेश चा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले अशी माहीती पोलीस उपनिरीक्षक योगेश गडकर यांनी दिली. दरम्यान सदर अपघातातून सुदैवाने अनिश किरकोळ जखमा होऊन बचावल्याची माहीती पोलीसांनी देऊन त्याच्यावर उपचार करून नंतर त्याला इस्पितळातून सोडण्यात आले. सदर प्रकरणात आगशी पोलीसांनी ठोकर देऊन घटनास्थळावरून पोबारा काढलेल्या त्या अज्ञात बसचालका विरुद्ध ‘हीट अॅण्ड रन’ चे प्रकरण नोंद केले असल्याची माहीती पोलीसांनी दिली.
दरम्यान आगशी येथील बायपास महामार्गावर दुचाकीला धडक देऊन घटनास्थळावरून पोबारा काढलेल्या त्या बसचालकाला बससहीत उशिरा रात्री पकडण्यात आल्याची माहीती आगशी पोलीस सूत्रांनी दिली. ही खासगी बस कर्नाटक येथील असल्याची माहीती पोलीस सूत्रांनी दिली असून याप्रकरणात अधिक तपास चालू आहे.