चोरीचा ट्रक देवून फेडले उधारीचे २५ लाख, त्रिकुटाची करामत
By सूरज.नाईकपवार | Published: June 1, 2023 08:51 PM2023-06-01T20:51:31+5:302023-06-01T20:51:49+5:30
एकास अटक, मालकाला मन:स्ताप
मडगाव : आपली २५ लाख रुपयांची उसनवारी फेडण्यासाठी तिघांनी नामी शक्कल लढविताना पंजाबमधून भाडे घेवून आलेला एक ट्रक आर्ले-नुवे बायपासवरून चोरला. ज्याची उधारी द्यायची आहे, त्याला ट्रकसह एक कार सुपूर्द केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी कुंकळ्ळी येथील सुनील दत्त याला अटक केली असून, चोरीला गेलेला ट्रकही जप्त केला आहे. चोरी करणाऱ्या त्रिकुटाचा शोध सुरू आहे. या प्रकरणात परतीचे भाडे मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकचालकास नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
पोलिसांनी सांगितले की, पंजाब येथून एकजण दहा टायरचा ट्रक घेऊन प्लायवूडची डिलिव्हरी करण्यासाठी आला होता. ट्रकचालक भागचंद्र नाथ राम याने महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये मालाची डिलिव्हरी केल्यानंतर गोव्यातून काही भाडे मिळेल का? हे पाहण्याचे ठरवले. १७ मे रोजी त्याला बांदा येथे विकास पहेलवान, मोहन रेबाडी व विकी हे तिघे भेटले. स्वत:ला राजस्थानी म्हणवून घेणाऱ्या त्या तिघांनी राम यांच्याशी जवळीक साधली. आमचा काही माल इंदोरला न्यायचा आहे असे सांगून त्याला आर्ले नुवे बगल मार्गवर ट्रक पार्क करण्यास सांगितले.
ज्यांच्याकडून माल उचलायचा आहे त्यांचा फोन लागत नसल्याचे संशयिताने सांगितले. पहिल्यांदाच गोव्यात आलेल्या रामला घेऊन ते जुने गोवा येथे फ्लॅटवर गेले. त्याला एक टपाल दाखविण्यात आले. आम्ही कुंडई येथे जात असल्याचे सांगून ते निघून गेले. नंतर चालक राम हा ट्रक पार्क केलेल्या जागेवर गेला असता, त्याला आपला ट्रक गायब झाल्याचे दिसले. काहीजणांनी ट्रक घेऊन गेल्याचे त्याला घटनास्थळी असलेल्या लोकांनी सांगितले. त्यामुळे राम यांनी काल गुरुवारी मायणा कुडतरी पाेलिस ठाणे गाठले व आपली कैफियत मांडली.
पोलिसांनी ट्रक चोरीचा तपास सुरू करत सुरुवातीला सुनील दत्त याच्या मुसक्या आवळल्या. सध्या विकास पहेलवान, मोहन रेबाडी व विकी फरार आहेत. तिघांनी सुनिल याच्याकडून २५ लाख घेतले होते. ते परत केले नव्हते. चोरलेला ट्रक आणि स्वत:ची कार त्यांनी सुनीलला दिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. भादंसंच्या ३७९ कलमाखाली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक रवी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत वेळीप पुढील तपास करीत आहेत.