इफ्फीसाठी यंदा २५ हजार प्रतिनिधी अपेक्षित - एल. मुरुगन
By किशोर कुबल | Published: November 9, 2023 06:18 PM2023-11-09T18:18:59+5:302023-11-09T18:19:57+5:30
इफ्फीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते गोव्यात असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत त्यांनी बैठकही घेतली.
पणजी : गोव्यात येत्या २० पासून होणार असलेल्या ५४ व्या इफ्फीसाठी २५ हजारहून अधिक प्रतिनिधी नोंदणी करतील अशी शक्यता केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री एल. मुरुगन यांनी व्यक्त केली.
इफ्फीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते गोव्यात असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत त्यांनी बैठकही घेतली. ते म्हणाले की, ‘ गोव्याचा इफ्फी दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. मुख्यमंत्री व अधिकाय्रांसोबत तयारीचा आढावा मी घेतला. ॲास्कर पुरस्कार विजेते मायकल डक्लस इफ्फीला येणार आहेत त्यांना राज्य अतिथी म्हणून खास वागणूक मिळायला हवी, असे मी सांगितले आहे.’
मुरुगन म्हणाले कि,‘ इफ्फीला अवघे अकरा दिवस राहिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही अधिकाय्रांना कामे गतीने करण्याचे निर्देश दिले आहेत. मी फिल्म बाजार, उदघाटन स्थळ, कला अकादमी, मास्टर क्लास आदी सर्व स्थळांना भेट देणार असून तयारीचा आढावा घेईन.’
मुरुगन म्हणाले कि,‘गेली तीन वर्षे मंत्री म्हणून मी गोव्यात इफ्फीला येतोय. दरवर्षी सुधारणा दिसून येते. गेल्या वर्षी १५ हजार प्रतिनिधींनी नोंदणी केली होती. या वर्षी आतापर्यंत ४ हजारजणांनी नोंदणी केलेली संख्या २५ हजारांवर पोचेल याची मला खात्री आहे.’ मुरुगन म्हणाले कि,‘ इफ्फीच्या तयारीबाबत मी समाधानी आहे.’ दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मुरुगन यांना गोव्याची कुणबी शाल भेट दिली.