गोव्यात ४ तासांत २६ कोरोनाबळी, ऑक्सिजन तुटवड्यावरून मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 04:47 AM2021-05-12T04:47:37+5:302021-05-12T04:48:10+5:30
गोव्यात गेल्या १० दिवसांत ५०० हून अधिक रुग्णांचे बळी गेले. यापैकी बहुतांश मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील आहेत. रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने त्यांचे मृत्यू ओढावत असल्याच्या तक्रारी त्यांचे नातेवाईक करीत आहेत.
सदगुरू पाटील -
पणजी : गोव्यातील कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर बनत आहे. कोरोनामुळे जाणाऱ्या बळींची संख्याही वाढत आहे. मंगळवारीही पहाटे २ ते ६ या वेळेत बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये २६ कोरोना रुग्णांनी अखेरचा श्वास घेतला. यानिमित्ताने हॉस्पिटलमधील ऑक्सिजन तुटवड्याचा वाद समोर आला आहे. यावरून सरकारमधील मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री हेच आमने-सामने आले आहेत.
गोव्यात गेल्या १० दिवसांत ५०० हून अधिक रुग्णांचे बळी गेले. यापैकी बहुतांश मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील आहेत. रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने त्यांचे मृत्यू ओढावत असल्याच्या तक्रारी त्यांचे नातेवाईक करीत आहेत.
मंगळवारी २६ रुग्णांचे मृत्यू झाल्याचे समोर येताच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकाळी ११ च्या सुमारास गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. त्यांनी थेट कोविड वाॅर्डमध्ये प्रवेश केला व रुग्णांच्या अडचणी जाणून घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना थेट सांगितले की, सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता नाही, परंतु रुग्णांपर्यंत हा वेळेत पोहोचत नाही. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचे व्यवस्थापन नीटपणे होत नाही.
मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आक्षेप घेतला. राणे म्हणाले, गैरव्यवस्थापन वगैरे होत नाही, मुख्यमंत्र्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे. गोव्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा आहे. जिथे १२०० सिलिंडर हवे तिथे फक्त ४०० मिळत आहेत. पहाटे चार तासांमध्ये जे २६ मृत्यू झाले, त्याची उच्च न्यायालयाने चौकशी करावी.