मोठी बातमी! गोव्यात कोरोनामुळे आज ७५ बळी; ऑक्सिजन तुटवड्यावरुन मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांमध्येच जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 08:02 PM2021-05-11T20:02:58+5:302021-05-11T20:03:53+5:30

गोव्यात रोज मध्यरात्रीनंतर चार तासांमध्ये वीस- पंचवीस कोविड रुग्णांचे मृत्यू होतात. मंगळवारीही पहाटे दोन ते सहा या वेळेत २६ रुग्णांचा रुग्णालयात जीव गेला आहे.

26 Covid Patients Die At Goa Hospital Health Minister Seeks Court Probe | मोठी बातमी! गोव्यात कोरोनामुळे आज ७५ बळी; ऑक्सिजन तुटवड्यावरुन मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांमध्येच जुंपली

मोठी बातमी! गोव्यात कोरोनामुळे आज ७५ बळी; ऑक्सिजन तुटवड्यावरुन मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांमध्येच जुंपली

Next

गोव्यात रोज मध्यरात्रीनंतर चार तासांमध्ये वीस- पंचवीस कोविड रुग्णांचे मृत्यू होतात. मंगळवारीही पहाटे दोन ते सहा या वेळेत २६ रुग्णांचा रुग्णालयात जीव गेला आहे. यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्यात रुग्णालयातील ऑक्सीजन तुटवड्याच्या विषयावरून वाद निर्माण झाला आहे. मध्यरात्रीनंतर रोज होणाऱ्या मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयाने चौकशी करून घ्यावी असे आरोग्य मंत्र्यांनी थेट जाहीर करून खळबळ उडवून दिली. गोव्यात गेल्या चोवीस तासांत एकूण ७५ रुग्ण दगावले व यापैकी २६ रुग्ण तरी ऑक्सीजनअभावी दगावले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.(26 Covid Patients Die At Goa Hospital, Health Minister Seeks Court Probe)

राज्यात रोज मध्यरात्रीनंतर म्हणजे पहाटे दोन ते सहा या वेळेत गोमेको रुग्णालयात जास्त मृत्यू होत असतात. हे सगळे मृत्यू कोविडग्रस्तांचे असतात व ओक्सीजन पुरवठ्यात खंड पडत असल्याने असे होत असतात अशा तक्रारी रुग्णांचे नातेवाईक सातत्याने करत आले आहेत. मंगळवारी चोवीस तासांत ७५ कोविडग्रस्तांचा जीव गेला. एका दिवसात एवढे बळी यापूर्वी कधीच गेले नव्हते.

दरम्यान, आज दक्षिण गोव्यातील जिल्ह्या रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाली होती. त्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. "रुग्णालयाच्या ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या टँकमध्ये मोठा बिघाड झालेला नाही. काहीतरी अडचण निर्माण झाली होती इतकं नक्की आहे. पण त्यावर नियंत्रण मिळविण्यात आलं आहे आणि परिस्थिती आता पूर्ववत झाली आहे",  अशी माहिती दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी रुचिका कट्याल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. 

मंगळवारी पहाटे २ ते ६ या वेळेत २६ कोविडग्रस्तांचे मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी सकाळी अकराच्या सुमारास बांबोळीच्या गोमेको रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी पीपीई किट घातले व ते कोविड वार्डमध्येही जाऊन आले. गोमेकोचे डॉक्टर्स, रुग्ण, परिचारिका यांच्याशी त्यांनी चर्चा केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

मुख्यमंत्री म्हणाले ऑक्सिजनचे गैरव्यवस्थापन
गोमेकोमध्ये ऑक्सीजनचा तुटवडा नाही, ऑक्सीजन पुरेसा आहे पण तो ऑक्सीजन वेळेत रुग्णांपर्यंत पोहचायला हवा असे मुख्यमंत्री म्हणाले. ऑक्सीजनचे गोमेकोत गैरव्यवस्थापन होत आहे. तथापि, यापुढे ही समस्या राहणार नाही, त्यावर आता लवकरच आपण उपाय काढत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. गोमेकोचे डॉक्टर्स खूप काम करतात. सिलिंडर संपले की नाही हे परिचारिकाही आता पाहू शकत नाही. त्यासाठी वेगळे मनुष्यबळ नेमले जाईल. ओक्सीजनअभावी यापुढे कुणाचा बळी जाणार नाही याची काळजी सरकार घेईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

न्यायालयीन चौकशी होऊ द्या: आरोग्यमंत्री विश्वजित राणे
आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी पत्रकारांशी बोलताना आक्रमक भूमिका घेतली. गोमेकोमध्ये ऑक्सीजनचे गैरव्यवस्थापन चालत नाही असे राणे म्हणाले. ओक्सीजनचे प्रमाणच कमी आहे. १२०० सिलिंडर हवेत पण गोमेकोला फक्त ४०० सिलिंडर मिळतात. ऑक्सीजनचे गैरव्यवस्थापन कुठे व कसे होत आहे ते मी मुख्यमंत्र्यांकडून जाणून घेईन. त्यांची कुणी तरी दिशाभुल केली असावी असे राणे म्हणाले. गोमेकोमध्ये रोज पहाटे २ ते ६ या वेळेत कोविडग्रस्तांचे अनेक मृत्यू होतात. हे मृत्यू का  होतात याची चौकशी व्हावी. उच्च न्यायालयानेच स्वतंत्रपणे या मृत्यूंची दखल घ्यावी व तजज्ञांकरवी न्यायालयाने श्वेतपत्रिका काढून घ्यावी असे राणे यांनी सूचविले. न्यायालयानेच स्वतंत्रपणे या विषयात हस्तक्षेप करावा असे राणे म्हणाले.

दरम्यान, आतापर्यंत राज्यात कोविडने एकूण १ हजार ८०४ लोकांचे जीव घेतले आहेत. गोमेको इस्पितळात रोज ३० - ४० रुग्णांचे बळी जातात व पूर्ण गोव्यात ५०-६० रुग्ण दगावत असतात. गेल्या अकरा दिवसांत पाचशेहून अधिक कोविडग्रस्तांचे जीव गेले. मंगळवारी ८ हजार ५०५ व्यक्तींच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या. नवे ३ हजार १२४ कोविडग्रस्त आढळले. राज्यभर आता सक्रिय कोविड रुग्णांची संख्या एकूण ३२ हजार ८३६ आहे.
 

Web Title: 26 Covid Patients Die At Goa Hospital Health Minister Seeks Court Probe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.