मडगावात अडीच लाखांचा गांजा जप्त, बिहारी युवकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 22:21 IST2018-12-07T22:20:39+5:302018-12-07T22:21:08+5:30
मडगाव पोलिसांनी यंदाच्या वर्षी अमली पदार्थावर कडक कारवाईचे सत्र सुरु केले असून, चालू वर्षात गांजा प्रकरणात ही सतरावी कारवाई आहे.

मडगावात अडीच लाखांचा गांजा जप्त, बिहारी युवकाला अटक
मडगाव : गोव्यात पर्यटन मौसमाला बहर आला असतानाच, अमली पदार्थाची प्रकरणे वाढू लागली आहे. राज्यातील मडगाव या प्रमुख शहरात शुक्रवारी पोलिसांनी एका कारवाईत अंदाजे दीड लाखांच्या किंमतीचा गांजा जप्त करताना एका 26 वर्षीय युवकाला अटक केली. संतोष जाधव असे संशयिताचे नाव असून, तो मूळ बिहार राज्यातील धर्मपुरा येथील रहिवाशी आहे. सध्या तो मडगाव भागातील रावणफोंड येथे रहात होता. मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.
मडगाव पोलिसांनी यंदाच्या वर्षी अमली पदार्थावर कडक कारवाईचे सत्र सुरु केले असून, चालू वर्षात गांजा प्रकरणात ही सतरावी कारवाई आहे. आतार्पयत करोडो रुपयांचा गांजा कारवाईत जप्त करण्यात आला आहे. सतोष जाधव हा सराईत गुन्हेगार असून, मागच्या वर्षी रेल्वे पोलिसांनी त्याला एका चोरी प्रकरणातही अटक केली होती. दोन महिन्याची शिक्षा भोगून तो तुरुगांतून बाहेर आला होता. मडगावच्या पालिका उदयानात संशयित आज आला असता, पोलिसांनी त्याला ताब्यात घेउन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे 405 ग्राम गांजा सापडला. मागाहून त्याला रितसर अटक करण्यात आली.
अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायदयांर्तगत पोलिसांनी संशयिताविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रतिक भट, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र पागी, पोलीस शिपाई गोरखनाथ गावस, बबलु झोरे यांनी संशयित संतोष जाधव याला अटक केली. पुढील पोलीस तपास चालू आहे.