२०२७ मध्ये २७ जागा? भाजपाला शक्य होईल का? दामू नाईकांसमोर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2025 09:29 IST2025-02-19T09:28:07+5:302025-02-19T09:29:26+5:30
मगच २०२७ साली किती जागा मिळू शकतात, याचा खरा अंदाज नेतृत्वाला येईल.

२०२७ मध्ये २७ जागा? भाजपाला शक्य होईल का? दामू नाईकांसमोर आव्हान
गोवा विधानसभेसाठी येत्या २०२७ मध्ये निवडणूक होईल. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आतापासूनच उत्साहात सांगू लागलेत की, भाजपला २०२७ च्या निवडणुकीत २७ जागा जिंकायच्या आहेत. कदाचित ३० जागा देखील भाजप जिंकू शकतो, असा विश्वास दामू व्यक्त करत आहेत. गेल्या आठवड्यातही ते तसे बोलले व परवा एका दैनिकाच्या वर्धापन दिन सोहळ्यातही त्यांनी तशा अर्थाचे विधान केले. दामू नाईक यांना कार्यकर्त्यांत उत्साह आणि चैतन्य जागविण्यासाठी तसे बोलावेच लागेल. ती एक राजकीय रणनीतीच असते. मात्र, वस्तुस्थिती काय आहे, लोकांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत, जनसामान्यांना शासकीय स्तरावरील भ्रष्टाचार किंवा नोकरशाहीचा अकार्यक्षमपणा कसा त्रासदायक ठरतोय, हे दामू नाईक यांना ठाऊक असेलच.
२०२७ च्या मार्चमध्ये निवडणूक होईल, असे गृहीत धरले तर केवळ दोनच वर्षे म्हणजे २४ महिनेच शिल्लक आहेत. २४ पैकी शेवटचे ४ महिने केवळ निवडणुकीच्या धामधुमीचे असतात, तेव्हा मोठीशी कामेही होत नाहीत. प्रत्यक्ष दीड वर्षच शिल्लक आहे, असे म्हणता येते. २०२६ साल हे निवडणूक वर्ष असे मानून सर्व विरोधी राजकीय पक्ष त्या वर्षीच कामाला लागतील. मात्र, भाजपने आतापासूनच २०२७ च्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केलीय, असे म्हणता येते. एका अर्थाने ते चांगलेही आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने खूप विचार करून प्रदेशाध्यक्षपद दामू नाईक यांच्याकडे सोपवले आहे. दामू आता ५३ वर्षांचे, तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत ५१ वर्षांचे आहेत. दोघांचा वयोगट समान असून, उत्साहदेखील समान पातळीवर आहे.
मुख्यमंत्री सावंत दिवसरात्र भाजपच्या सर्व कार्यक्रमांमध्ये, बैठकांमध्ये सहभागी होत असतात. दामू नाईक व प्रमोद सावंत यांच्यात सुसंवाद राहिला, तर भाजपलाच लाभ होईल, पण जनभावना काय आहे, याचा आढावाही प्रदेशाध्यक्षांना घ्यावा लागेल. प्रत्येक मंत्र्याच्या कामकाजाची पद्धत व प्रगतीचा गंभीरपणे व तटस्थपणे आढावा घेऊन रिपोर्ट कार्ड तयार करावे लागेल. दामू नाईक यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर लगेच जाहीर केले होते की, मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड आपला पक्ष तयार करील. दामू गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून आले. ते दोनवेळा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनादेखील भेटले. दामू नाईक यांना शाह यांनी योग्य मार्गदर्शन केले, अशी माहिती मिळते. गोव्यात संघटनात्मक पातळीवर किंवा मंत्रिमंडळातदेखील जे बदल यापुढे होतील त्याची माहिती कदाचित दामू नाईक यांच्याकडे असेल, पण त्यांनी ती गुप्त ठेवली आहे. गोव्याच्या मंत्रिमंडळात काही बदल करून आता सरकार अधिक लोकाभिमुख झाले आहे, असा संदेश द्यावा लागेल.
सरकारी कार्यालयांमध्ये कित्येक खेपा मारूनही कामे होत नाहीत, ही लोकांची समस्या आहे. गोवा सरकार मोठमोठ्या प्रकल्पांना लाखो चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जमिनी सक्तीने देऊ पाहते. याविरुद्ध जनतेत असंतोष निर्माण होतोय, हे लक्षात घ्यावे लागेल. मयेवासीयांशी खेळण्याचा प्रयत्न सरकार करतेय. कधी धारबांदोड्याची, कधी थिवीची, तर कधी पेडण्यातील सुपीक जमीन केंद्रीय प्रकल्पांना देण्याचा प्रयत्न होतोय. हे प्रकल्प गोंयकारांना किती नोकऱ्या मिळवून देतात? किती गोमंतकीयांना रोजगार संधी मिळते हे एकदा तपासून पाहावे लागेल. सांकवाळ भागात भुतानी प्रकल्पाविरुद्ध लोकांमध्ये असलेला रोष, तसेच डिचोली तालुक्यात मायनिंगविरुद्ध सुरू असलेले आंदोलन याकडे भाजप दुर्लक्ष करू शकत नाही. तो आगीशी खेळ ठरेल.
सरकारने धारगळमध्ये सनबर्न लादला होता व पोलिसांचा वापर करून जनतेचा आवाज बंद केला होता. दामू नाईक प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व सकारात्मक भावना वाढली, हे मान्य करावे लागेल. निष्ठावान कार्यकर्त्याला आपल्या पक्षात सर्वोच्च स्थान दिले जाते, हा सुखद धक्का भाजपच्या कार्यकर्त्यांना आवडला. पूर्वी भाजप सोडून गेलेले अनेकजण पुन्हा पक्षात येऊ पाहात आहेत. मात्र, दामूंना पुढील काळात तरी राज्यभर जनसंपर्क यात्रा काढावी लागेल. लोकांमध्ये थेट जाऊन जनतेची मते जाणून घ्यावी लागतील. मगच २०२७ साली किती जागा मिळू शकतात, याचा खरा अंदाज नेतृत्वाला येईल.