वाहतूक नियमांचा भंग करणा-या २७३ जणांचे परवाने निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 08:25 PM2018-01-16T20:25:30+5:302018-01-16T20:29:10+5:30
पणजी - वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गेल्या आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या काळात तब्बल २७३ जणांचे परवाने आरटीओने निलंबित केले.
वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी ही माहिती दिली. वाहन चालविताना मोबाइल फोनवर बोलल्या प्रकरणी १३३ जणांचे तर मद्य किंवा ड्रग्स सेवन करुन वाहन चालविल्या प्रकरणी १११ जणांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित केले. लाल दिवा लागला असताना सिग्नल तोडून वाहन हाकल्या प्रकरणी २१, वेगाने वाहन चालविल्या प्रकरणी १, मालवाहू वाहनात क्षमतेपेक्षा अधिक माल भरल्या प्रकरणी १, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक केल्या प्रकरणी ६ जणांचे परवाने निलंबित केले. ही मोहीम चालूच राहणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, दुसरीकडे वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचा भंग करणाºयांचे फोटो, व्हिडिओ वॉटस्अपवर पाठवा, असे आवाहन केल्यानंतर त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पोलिसांनी वॉटसअपवर येणाºया फोटोंमध्ये पार्किंग निषिध्द विभागात ठेवलेली वाहने, डबल पार्किंगची प्रकरणे जास्त आहेत. संबंधित वाहनमालकांचा शोध घेऊन त्यांच्या घरी चलन पाठवली जाताआणि दंड वसूल करुन घेतला जातो. मोबाइल नंबर ७८७५७५६११0 वर उल्लंघनाचे फोटो किंवा क्लिप पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी आधी या नंबरवर मॅसेज पाठवून स्वत:ची नोंदणी करावी लागेल. स्वत:चे नाव, मोबाइल क्रमांक, व इमेल आयडी पाठवून नोंदवून नंतर फोटो पाठवता येतील. स्वत:चा मोबाइल क्रमांक हाच युनिक आयडी असेल. त्या क्रमांकाचा उल्लेख करावा लागेल.
वाहतूक विभागाच्या या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. एकेरी मार्ग असताना वाहतूक नियम तोडून विरुध्द दिशेने वाहन हाकणे, पदपथ किंवा झेब्रा क्रॉसिंगवर वाहन पार्क करणे, दुचाकीवर तिघे बसून वाहन हाकणे, योग्य नंबरप्लेट नसणे, सीट बेल्ट परिधान न करणे, दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान न करणे, काळ्या काचा असलेली मोटार आदी उल्लंघनांचे फोटो किंवा व्हिडिओ चित्रफित वॉटस्अपवर पाठवता येईल. तसेच सिग्नल तोडणे, बेदरकारपणे वाहन हाकणे, वाहन चालवताना मोबाइल फोन वापरणे आदी उल्लंघनांची व्हिडिओ चित्रफित पाठवता येईल. नियमभंग करणाºयांवर पोलिस कडक कारवाई करतील. ठराविक पॉइंटस झाल्यानंतर इनामही दिले जाते.