गोव्यात विश्वकर्मा योजनेसाठी २९ हजार अर्ज; मुख्यमंत्र्यांकडून आढावा
By किशोर कुबल | Published: January 1, 2024 08:18 PM2024-01-01T20:18:12+5:302024-01-01T20:19:06+5:30
मुख्यमंत्र्यांकडून आढावा : येत्या आठवड्यापासून अर्जदारांना कौशल्य प्रशिक्षण देणार
किशोर कुबल/पणजी
पणजी : विश्वकर्मा योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत २९ हजार अर्ज आले आहेत. येत्या आठवड्यापासून अर्जदारांना कौशल्य प्रशिक्षण देण्याच्या बाबतीत प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्रीप्रमोद सावंत यांनी अधिकाय्रांना दिले आहेत. योजनेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल उच्चस्तरीय बैठक घेतली. श्रमजीवी कारागिरांना विश्वकर्मा योजनेतून प्रारंभी एक लाख आणि वर्षभरानंतर दोन लाख रुपये अल्पव्याजी कर्ज दिले जाईल तसेच मोफत प्रशिक्षणाची सोय केली जाईल. पंधरा हजार रुपये किमतीची अवजारे ( टूल किट) मोफत दिले जाईल.
केंद्र सरकारच्या या योजनेत मूर्तिकार, लोहार, न्हावी, सुतार, कुंभार आदी १८ प्रकारच्या पारंपरिक व्यावसायिकांना कौशल्य प्रशिक्षणाबरोबरच अवजारे, उपकरणे खरेदी करण्यासाठी २ लाख रुपयांपर्यंत ५ टक्के दराने अल्पव्याजी कर्ज मिळेल. तसेच या कारागिरांच्या वस्तूंना बाजारपेठही उपलब्ध करुन दिली जाणार आहे. कौशल्य प्रशिक्षण काळात प्रतीदिन ५०० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले कि,‘श्रमजीवी कारागिरांना विश्वकर्मा योजनेतून केंद्राने एक उत्तम व्यासपीठ मिळाले आहे. कारागिरांची पोर्टलवर नोंदणी केली जाईल. ग्रामपंचायती ते खरेच कारागीर आहेत याची खातरजमा करून शिक्कामोर्तब करतील.'