गोव्यात वित्त पुरवठा संस्थेला कर्मचाऱ्यांकडून पावणे सात लाखांचा चुना; दोघांना अटक, एकाचा शोध चालू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 01:14 PM2020-02-19T13:14:13+5:302020-02-19T13:14:49+5:30
कर्मचाऱ्यांनीच एका वित्त पुरवठा संस्थेला फसविल्याची घटना गोव्यात उघडकीस आली असून, या अफरातफर प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी तिघांजणावर गुन्हा नोंद करताना दोघांना अटक केली आहे.
मडगाव: कर्मचाऱ्यांनीच एका वित्त पुरवठा संस्थेला फसविल्याची घटना गोव्यात उघडकीस आली असून, या अफरातफर प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी तिघांजणावर गुन्हा नोंद करताना दोघांना अटक केली आहे. मोहिबीब दस्तागिर भगवान (32) व सैफान शेख (22) अशी अटक केलेल्यांची नावे असून, सिध्दाराम वाघामारे या अन्य एका संशयिताचा सदया पोलीस शोध घेत आहेत.
स्पंदन स्फुर्ती फायनान्स लिमिटेडच्या घोगळ येथील कार्यालयात संशयितांनी एकूण 6 लाख 63 हजार 354 रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. अटक केलेले दोन्ही संशयित मूळ महाराष्ट्रातील सोलापूर येथील आहेत. या फायनान्स लिमिटेडचे नितेश डोंगरदिवे हे तक्रारदार आहेत. भारतीय दंड संहितेच्या 408 कलमाखाली पोलिसांनी संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे. फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशाल देसाई हे पुढील तपास करीत आहेत.
एप्रिल 2018 ते डिसेंबर 2019 दरम्यान अफरातफरीची ही घटना घडली होती. संशयित भगवान हा ब्रँच मॅनेजर तर अन्य दोघे क्रेडीट असिस्टन्स म्हणून काम करीत होते. या वित्त पुरवठातर्फे कर्ज देण्यात येते. संशयितांनी कर्जधारकाडून रक्कम वसूल करुन ती संस्थेत जमा न करता स्वतच्या कामासाठी वापरली होती असे तपासात उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयिताची बनवेगिरी उघड झाल्यानंतर यासंबधी तक्रारदारने पोलिसांत तक्रार केली.