२०२७ मध्ये गोव्यात ३० पार! इंडिया आघाडीची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2024 11:22 AM2024-06-06T11:22:34+5:302024-06-06T11:23:33+5:30
विधानसभा, पंचायत निवडणुकीतही फॉर्म्युला
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: विरोधी पक्ष एकत्र आल्यामुळे काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीला दक्षिण गोव्यात लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला. तसाच विजय विधानसभा निवडणुकीतही मिळविणार आणि दोन्ही जिल्ह्यांत मिळून ३० जागा जिंकणार, अशी घोषणा इंडिया आघाडीकडून काँग्रेस हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, दक्षिण गोव्यात काँग्रेसला ९ विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली आहे. उत्तर गोव्यात तीन मतदारसंघात आघाडी मिळाली आहे. त्यामुळेच एकत्र येऊन लढलो, तर इंडिया आघाडीला दक्षिण गोव्यात १७, तर उत्तर गोव्यात १३ जागा मिळू शकतात, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे २०२७ मधील गोवा विधानसभेच्या निवडणुकीत ३० पार अशीच इंडिया आघाडीची घोषणा राहणार असल्याचेही ते म्हणाले.
इंडिया आघाडी बनेल लोकांचा आवाज : अमित पाटकर
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी ही भाजपच्या पतनाची सुरुवात असल्याचे म्हटले आहे. आघाडी पंचायत ते विधानसभेपर्यंत गोव्यात इंडिया आघाडी बनली आहे. ती लोकांचा आवाज बनून राहणार असल्याचे विजय सरदेसाई यांनी सांगितले. ही आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीपुरतीच सीमित नव्हती तर ग्रामपंचायत स्तरापासून विधानसभा स्तरावरही एकत्र येऊनच लढणार आहेत. त्यामुळे भाजपला कुठेही डोके वर काढू दिले जाणार नाही, असेही ते म्हणाले.
फुटीर आमदार मताधिक्क्य मिळविण्यात अपयशी
इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनीही युरी आलेमाव यांच्या सुरात सूर मिळविताना तशीच घोषणा केली. ते म्हणाले की, गोव्यात इंडिया आघाडी कायम टिकणार आहे. भाजपचा अहंकार अशामुळेच जिरविणे शक्य होणार आहे. भाजपने ८ आमदार फोडले म्हणून हे फोडलेले आमदार भाजपला मते मिळवून देऊ शकले नाहीत. देवाचा माणूस म्हणविणाऱ्याचीही परिस्थिती मडगावात दयनीय झाली आहे, असे ते म्हणाले. नवनिर्वाचित खासदार विरियातो फर्नाडिस यांनी आपण दिल्लीत गोमंतकियांचा आवाज बनणार असल्याची ग्वाही दिली. प्रचारादरम्यान लोकांची दुःखे, समस्या पाहिल्या आहेत, जाणून घेतल्या.