दिल्लीतील अग्निशमन विभागातील ३० प्रशिक्षणार्थींनी घेतले पणजी केंद्रात प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2024 04:47 PM2024-01-13T16:47:09+5:302024-01-13T16:47:18+5:30
अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाचे संचालक नितीन व्ही. रायकर यांनी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल प्रशिक्षणार्थी उप-अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
नारायण गावस
पणजी : दिल्ली येथील अग्निशमन विभागातील ३० प्रशिक्षणार्थी उप अधिकाऱ्यांनी पणजी येथील प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रात यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. नागपूर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाद्वारे ५० व्या बाह्य उप-अधिकाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण प्रायोजित करण्यात आले होते. १८ डिसेंबर २०२३ ते १२ जानेवारी २०२४ या काळात त्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण काळात गोवा राज्यातील विविध उद्योग, रुग्णालय, मॉल, विमानतळ आदी ठिकाणांना भेटी दिल्या.
अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाचे संचालक नितीन व्ही. रायकर यांनी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल प्रशिक्षणार्थी उप-अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच मिळालेले प्रशिक्षण आणि ज्ञानाबाबत आपल्या सहकाऱ्यांनाही शिक्षित करावे असे आवाहन संचालक रायकर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना केले. यावेळी उत्तर विभागाचे सहायक विभागीय अधिकारी बॉस्को फेराओ, स्टेशन अग्निशमन अधिकारी, उप-अधिकारी आणि गोवा राज्य अग्निशमन दल प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक उपस्थित होते. स्टेशन अग्निशमन अधिकारी (प्रशिक्षण विभाग) रवी नाईक यांनी सूत्रसंचालन केले तर बोस्को फेराव यांनी आभार मानले.