गोव्यातील पर्रा-नागवा भागात 300 होम स्टे, नवा ओडीपी तयार होणार - मायकल लोबो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 11:29 PM2018-02-19T23:29:56+5:302018-02-19T23:30:10+5:30
गोव्याच्या किनारपट्टी भागात असलेल्या पर्रा, नागोवा, हडफडे हे भाग उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाच्या (एनजीपीडीए) अखत्यारित आणण्यात आले आहेत. पर्रा भागात तीनशे होम स्टे विकसित केले जातील.
पणजी : गोव्याच्या किनारपट्टी भागात असलेल्या पर्रा, नागोवा, हडफडे हे भाग उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाच्या (एनजीपीडीए) अखत्यारित आणण्यात आले आहेत. पर्रा भागात तीनशे होम स्टे विकसित केले जातील. यामुळे पर्यटकांचीही सोय होईल व स्थानिकांना स्वयंरोजगाचा मार्ग खुला होईल, असे एनजीपीडीएचे चेअरमन या नात्याने मायकल लोबो यांनी सोमवारी येथे सांगितले. पर्रा भागासाठी नवा ओडीपी तयार केला जाणार आहे.
राज्यातील मडगाव वगळता सर्व भागांचे बाह्यविकास आराखडे रद्द करून नवे ओडीपी तयार केले जातील, असे सूतोवाच नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी नुकतेच केले होते. त्याविषयी पत्रकारांनी विचारले असता लोबो म्हणाले, की कळंगुट-कांदोळीचा ओडीपी रद्द होणार नाही. आम्ही ओडीपीचा मसुदा तयार केल्यानंतर साठ दिवसांसाठी तो मसुदा सूचना व आक्षेपांसाठी खुला करण्यास नगर नियोजन खात्याकडे मान्यता मागितली. खात्याने मान्यता दिल्यानंतर आम्ही तो मसुदा आता खुला केला आहे. कळंगुट- कांदोळी ओडीपीच्या मसुद्याविरुद्ध काहीजण न्यायालयात गेले होते. तथापि, आम्ही सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच मसुदा तयार केला आहे. त्यामुळे ओडीपी रद्द केला जाणार नाही. येत्या साठ दिवसांनंतर ओडीपीला अंतिम रुप दिले जाईल.
लोबो म्हणाले, की पर्रा भागात एकूण दहा हजार घरे आहेत. तिथे संपन्न असा निसर्ग आहे. हिरवीगार शेते आहेत. टेकडय़ा आहेत. तिथे तीनशे होम स्टे विकसित केल्यास त्याचा लाभ स्वयंरोजगारासाठी होईल. तीनशे होम स्टे तयार करण्यास आम्ही वाव देणार आहोत. फक्त मलनिस्सारणाची टाकी तेवढी प्रत्येकास बांधावी लागेल. त्या होम स्टेमुळे अनेकांना रोजगार मिळेल. दरमहा निश्चित असे भाडे मिळू लागेल. कारण पर्यटकांना पर्रा गावात शांतता व निसर्गाच्या सान्नीध्यात राहणो आवडते.
लोबो म्हणाले, की कळंगुट कांदोळीच्या बाह्यविकास आराखडय़ामध्ये (ओडीपी) पर्रा, नागवा व हडफडे भागाचा समावेश नाही. त्या भागासाठी अगोदर स्वतंत्र भू-वापर आराखडा तयार केला जाईल. कळंगुट-कांदोळीसाठीही तसेच करण्यात आले होते. त्यानंतर स्वतंत्र ओडीपीची प्रक्रिया पर्रासाठी सुरू होईल.