गोव्यात डिसेंबरमध्ये कोविडचे ३३ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 02:21 PM2020-12-21T14:21:45+5:302020-12-21T14:22:05+5:30
अलिकडे रोज दोन किंवा तीन रुग्णांचे कोविडमुळे निधन होऊ लागले आहे.
पणजी : डिसेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. कोविड रुग्ण संख्याही झेडपी निवडणुकीनंतर वाढत असल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर महिन्यात गेल्या २०-२१ दिवसांत कोविडमुळे ३३ रुग्णांचा जीव गेला आहे.
दि. ३० नोव्हेंबरपर्यंत कोविड बळींची संख्या ६८८ होती. त्यावेळी राज्यात १ हजार ३३५ सक्रिय रुग्ण होते. दि. २९ नोव्हेंबरपर्यंत ६८७ बळी होते. त्यावेळी सक्रिय रुग्ण संख्या १३२७ होती. आता सक्रिय रुग्ण संख्या ९७२ आहे. एकूण बळींचे प्रमाण ७२१ झाले आहे.
अलिकडे रोज दोन किंवा तीन रुग्णांचे कोविडमुळे निधन होऊ लागले आहे. यात बहुतांश ज्येष्ठ नागरिकच आढळून येत आहेत. विविध व्याधींनी त्रस्त असलेले ज्येष्ठ नागरिक कोविड झाल्यानंतर मरण पावतात असा अनुभव डिसेंबरमध्येही आला.
सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये कोविडमुळे जेवढे बळी गेले, त्या तुलनेत डिसेंबरमध्ये बळींचे प्रमाण डिसेंबरमध्ये कमी आहे. डिसेंबरमध्ये तीन-चारवेळा दिवस असे आले की, तेव्हा चोवीस तासांत कोविडमुळे कुणीच दगावला नाही. सध्या प्रत्येक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात पूर्वीच्या तुलनेत आता कोविडग्रस्तांची संख्या कमी दिसते. पूर्वी प्रत्येक छोट्या शहरातील व ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात खूप कोविडग्रस्त होते. प्रत्येक ठिकाणी पन्नासहून अधिक कोविडग्रस्त होते. आता हे प्रमाण वीस- पंचावीसवर आले आहे.
डिचोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात आता १३ कोविडग्रस्त आहेत. साखळीत १८ तर वाळपईच्या क्षेत्रात फक्त ८ कोविडग्रस्त आहेत. म्हापसा व पणजीच्या क्षेत्रातही कोविडग्रस्तांची संख्या कमी झाली आहे. म्हापशात आता १५ तर पणजीत ५९ कोविड रुग्ण आहेत. खोर्लीला १७ तर शिवोलीला २५ कोविड रुग्ण आहेत. कोलवाळला संख्या १५ तर चिंबलला संख्या ३८ पर्यंत खाली आली आहे.
सांगेमध्ये २३ तर शिरोडा येथे १२ व बाळ्ळी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात आता संख्या १९ आहे. कुडचडे आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ३३ तर मडकई आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात कोविड रुग्णांची संख्या १० झाली आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वी संख्या खूप कमी होती. आता चाचण्यांच्या तुलनेत कोविड पॉझिटीव रुग्णांची संख्या वाढतेय. टीपीआर ९.१ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे रविवारी स्पष्ट झाले. येत्या आठवड्यात हे प्रमाण ८ ते ११ टक्के असे देखील राहू शकते, असे जाणकारांना वाटते.