प्रगतशील सासष्टीत अजुनही 3,361 घरे शौचालयाविना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 03:21 PM2018-09-18T15:21:01+5:302018-09-18T15:31:14+5:30
2018च्या अखेरीस गोवा राज्य हगणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने डोळ्यासमोर ठेवले आहे.
मडगाव - 2018च्या अखेरीस गोवा राज्य हगणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने डोळ्यासमोर ठेवले आहे. गोव्यातील सर्वात प्रगतशील तालुका मानला जाणाऱ्या सासष्टीतच अद्याप 3361 घरांना शौचालयाची सोय नसल्याचे सरकारी आकडेवारीतूनच उघड झाले आहे. ही आकडेवारी सरकारी असल्याने प्रत्यक्षातील स्थिती याही पेक्षा भयानक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सासष्टी हा गोव्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका असून पर्यटन उद्योगामुळे त्याचा पुढारलेल्या तालुक्यात समावेश होतो. या तालुक्यातील लोकांचे दरडोई उत्पन्न चांगले असूनही शौचालयाबाबतची या भागातील परिस्थिती चिंता करण्यासारखीच आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे हल्लीच या तालुक्याचे सर्वेक्षण केले असता या तालुक्यातील 42719 घरांपैकी 39358 घरांना शौचालयाची सोय असल्याचे दिसून आले. मात्र अजुनही 3361 घरांना शौचालयाची सोय नसल्यामुळे ते उघडय़ावर शौच करीत असल्याचे दिसून आले आहे. सासष्टी तालुक्यात एकूण तीस गावांचा समावेश होतो. त्यापैकी केवळ रुमडामळ दवर्ली पंचायत क्षेत्रतच सर्व घरांना शौचालयाची सोय असल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
या सर्वेक्षणातून जी माहिती पुढे आली आहे. त्यानुसार नुवे पंचायत क्षेत्रात 325 तर वेळळी पंचायत क्षेत्रात 294 घरांना शौचालयाची सोय नाही. किनारपट्टी भागात असलेल्या काना बाणावली या पंचायत क्षेत्रात 258 घरे शौचालयाशिवाय आहेत. याशिवाय लोटली येथे 240, चिंचोणो-देवसा येथे 197, पारोडा येथे 146, राय येथे 145 तर कुडतरी येथे 143 घरांना शौचालयाची सोय नाही.
येत्या शंभर दिवसांत या 3361 घरांना शौचालयाची सोय उपलब्ध करुन देण्यास राज्य सरकारला शक्य होणार का? या संबंधी गटविकास अधिकारी अमितेश शिरवईकर यांची प्रतिक्रिया विचारली असता, जर शौचालय बांधण्यासाठी जागा मिळाल्यास आणि त्या जागेविषयी कुठलीही कायदेशीर अडचण नसल्यास हे उदिदष्ट पूर्ण करणे फारसे कठीण होणार नाही. जर काही ठिकाणी जागा मिळाली नाही तर सामुदायिक शौचालये बांधून ही समस्या सोडवता येणे शक्य आहे असे ते म्हणाले.