कामाक्षीच्या मानेवर चाकूने केले ३५ वार; संशयी स्वभावामुळे प्रकाश मारहाण करायचा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 09:44 AM2023-09-03T09:44:09+5:302023-09-03T09:45:05+5:30
पर्वरी येथील खून प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : आपली प्रेयसी आपल्याशी प्रेमसंबंध तोडते आहे, असा संशय आल्यामुळे माथेफिरू प्रियकर फकीर उर्फ प्रकाश चुंचवाडने प्रेयसीच्या मानेवर चाकूचे सपासप ३५ वार करून तिला ठार मारले. तिच्या मृतदेहाच्या वैद्यकीय तपासणी अहवालातून हे उघड झाले आहे.
कामाक्षीच्या खूनप्रकरणी पोलिसांनी प्रकाशसह त्याच्या मित्राला शुक्रवारी अटक केली. प्रकाश कामाक्षीच्या मृतदेहावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पोस्टमार्टम करण्यात आले. तिच्या मानेवर ३५ जखमा आढळल्या आहेत, तसेच रक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाल्याचेही अहवालात म्हटले आहे.
दोघांचेही प्रेमप्रकरण सुरू होते, असे पोलिस तपासातून उघड झाले आहे, तसेच अलीकडच्या काळात कामाक्षी प्रकाशला टाळण्याचा प्रयत्न करीत होती. त्याच्या लहरी स्वभावाला ती वैतागल्याचेही सांगितले जाते. आपल्याला कामाक्षी टाळत असल्याचे लक्षात आल्यामुळे प्रकाश तिच्यावर संशय येऊ लागला. तिचे दुसऱ्याशी सूत जुळले असावे, असा संशय घेऊन तिला कायमचा संपविण्यासाठी त्याने कट आखला आणि त्याची अंमलबजावणीही केली. पर्वरी येथे तिचा खून करून निरुपडी करकात नावाच्या आपल्या मित्राच्या मदतीने तिचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन टाकला होता. कामाक्षी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी नोंदविल्यानंतर तपास सुरू झाला आणि या खुनाचा छडा लागला.
खुनानंतर एक दिवस विचारात
प्रकाशविरोधात तक्रार केल्यानंतर कामाक्षी रात्री थेट आपल्या पर्वरी येथील फ्लॅटवर आली. तिच्यापाठोपाठ प्रकाशही आला. यावेळी दोघांत जोरदार भांडण झाले आणि तेव्हाच तिचा खून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. बुधवारी दिवसभर प्रकाशने मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची, यासाठी वेळ घेतल्याचे सांगितले जात आहे.
संशयी स्वभाव
प्रकाशच्या लहरी स्वभावाला कामाक्षी कंटाळली होती. आपल्या एका मित्रासोबत तिचे सूत जुळल्याचा त्याला संशय होता, यातूनच तो तिला त्रास द्यायचा. कामाक्षी कोणासोबतही बोलली, तरी प्रकाश तिला मारहाण करत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.