भाजप सदस्यत्वाचा सत्तरीने केला विक्रम; विश्वजीत व दिव्या राणेंमुळे ३५ हजार सदस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 02:13 PM2024-10-11T14:13:07+5:302024-10-11T14:14:05+5:30
आरोग्यमंत्री विश्वजित राणे व आमदार दिव्या राणे यांच्या नियोजनाने ही विक्रमी सदस्यसंख्या झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, सत्तरी : सत्तरी तालुक्याने भाजप सदस्य नोंदणीबाबत विक्रमच केला आहे. वाळपई व पर्ये अशा दोन मतदारसंघांमध्ये मिळून ३५ हजार भाजप सदस्यांची नोंदणी काल झाली. वाळपई मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे १८ हजार ६९७ सदस्य झाले आहेत. वाळपईनंतर पर्येचा क्रमांक लागतो. तिथे सोळा हजार ४०८ तर साखळी मतदारसंघात १६ हजार २६९ सदस्य नोंद झाले आहेत. आरोग्यमंत्री विश्वजित राणे व आमदार दिव्या राणे यांच्या नियोजनाने ही विक्रमी सदस्यसंख्या झाली आहे.
पेडणेत खूप कमी सदस्य नोंदणी आहे. तिथे फक्त २ हजार ४४३ सदस्य नोंद झाले तर मांद्रे मतदारसंघात ७ हजार ५५३ सदस्य नोंदणी झाली. डिचोलीत ६ हजार १३८ तर शिवोलीत फक्त २ हजार ५४ सदस्य भाजप नोंद करू शकला. कळंगुटमध्ये १ हजार ३५९ तर साळगावमध्ये ५ हजार ३९७ सदस्य नोंद झाले.
भाजपने पणजीत आता वेग वाढवला. मंत्री बाबूश मोन्सेरात यांनीही लक्ष घातले व त्यामुळे पणजीत आता ५ हजार ४८२ सदस्य झाले आहेत. सांताक्रुझला मात्र फक्त २ हजार ६५५ तर सांतआंद्रेत फक्त २ हजार ६४० सदस्य भाजप नोंद करू शकला.
फोंड्यात चार हजारांवर सदस्य
धक्कादायक गोष्ट म्हणजे कुंभारजुवे मतदारसंघात ३ हजार २५१ एवढेच सदस्य भाजपला मिळाले आहेत. मयेत ६ हजार ८५६ आहे तर फोंड्यात ४ हजार ४४३ लोकांनी भाजप सदस्यत्व घेतले आहे. दाबोळी मतदारसंघात देखील जास्त सदस्य नोंद झाले. तिथे ८ हजार ९७९ सदस्यांची नोंद झाली आहे.