वेर्णा महामार्गावरील अपघातात ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 11:47 PM2021-02-13T23:47:12+5:302021-02-13T23:47:24+5:30
goa : वेर्णा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक श्रीधर कामत यांनी दिलेल्या माहीतीनुसार संध्याकाळी ५ च्या सुमारास हा अपघात घडला.
वास्को: शनिवारी (दि.१३) संध्याकाळी वेर्णा महामार्गावर झालेल्या अपघातात नवेवाडे येथे राहणा-या ३५ वर्षीय जेरीटो फर्नांडीस या तरुणाचा मृत्यू झाला. जेरीटो ‘व्हॅगनार’ चारचाकीने वास्कोहून वेर्णाच्या दिशेने जाताना तो वेर्णा महामार्गावरील एका चारचाकी ‘शोरूम’ बाहेरील रस्त्यावर पोचला असता त्याचा स्टिअरिंग वरील ताबा जाऊन त्यांने येथील वीज खांब्याला जबर धडक दिल्यानंतर त्याची चारचाकी रस्त्यावर उलटली.
वेर्णा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक श्रीधर कामत यांनी दिलेल्या माहीतीनुसार संध्याकाळी ५ च्या सुमारास हा अपघात घडला. नवेवाडे येथील जेरीटो चारचाकीने (क्र: जीए ०८ एन १९३५) वेर्णाच्या दिशेने जात होता. तो साकवाळ - वेर्णा महामार्गावर पोचला असता अचानक त्याचा चारचाकीच्या स्टीअरींग वरील ताबा सुटून त्यांने रस्त्याच्या दाव्या बाजूला असलेल्या वीज खांब्याला जबर धडक दिली. वीज खांब्याला धकड दिल्यानंतर त्याची चारचाकी रस्त्यावर उलटली. तसेच जेरीटो चारचाकीच्या बाहेर जाऊन रस्त्यावर फेकला गेला. याअपघातात त्या वीज खांब्याची बरीच नुकसानी झाल्याची माहीती पोलीसांनी दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या जेरीटो ला उपचारासाठी त्वरित चिखली येथील उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याची माहीती पोलीसांनी दिली. वेर्णा पोलीसांनी अपघाताचा पंचनामा करून जेरीटो चा मृतदेह मडगाव येथील इस्पितळाच्या शवगृहात पाठवून दिला आहे. वेर्णा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक श्रीधर कामत यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.