कॅसिनोकडून सरकारचा ३५० कोटी महसूल थकविला; मालमत्ता जप्त करून वसुली करणार - मुख्यमंत्री
By वासुदेव.पागी | Updated: July 30, 2024 15:04 IST2024-07-30T15:04:13+5:302024-07-30T15:04:41+5:30
राज्यात विविध ठिकाणचे जमिनीवरील कसिनोंकडून सरकारला फार मोठा महसूल येणे बाकी असल्याचे विधानसभेत विचारलेल्या एका प्रश्नामुळे आढळून आले आहे

कॅसिनोकडून सरकारचा ३५० कोटी महसूल थकविला; मालमत्ता जप्त करून वसुली करणार - मुख्यमंत्री
पणजीः राज्यात विविध ठिकाणी असलेल्या मोठ्या हॉटेलच्या जमिनवरील कॅसिनोकडून राज्यसरकारला एकूण ३४९.८९ कोटी रुपये महसूल थकबाकी असल्याची माहिती विधानसभेत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्याकडून देण्यात आली. एका वर्षाच्या आत या कॅसिनोंची मालमत्ता जप्त करून महसूल थकबाकी फेडून घेतली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले.
राज्यात विविध ठिकाणचे जमिनीवरील कसिनोंकडून सरकारला फार मोठा महसूल येणे बाकी असल्याचे विधानसभेत विचारलेल्या एका प्रश्नामुळे आढळून आले आहे. कॅसिनोकडून येणे असलेल्या महसूल थकबाकीचे काय करणार? वसुलीच्या बाबतीत सरकारने काय केले आहे असा प्रश्न आमदार विजय सरदेसाई यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला विचारला होता. या कॅसिनोच्या मालमत्ता जप्त करून थकबाकीची रक्कम फेडून घेतली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
या कॅसिनोची थकबाकी असतानाही त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण का करण्यात आले असा प्रश्न सरदेसाई यांनी विचारला असता मागील पाच वर्षात एकाही कॅसिनोच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात आले नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कोविड संपला तरी महसूल नाही
कोविड महामारीचे निमित्त सांगून काही कॅसिनोंकडून कॅसिनो शुल्कात सवलत मागितली होती. अनेक कॅसिनोकडून येणारा महसूल कोविड काळापासून थकलेला आहे. तीन कँसिनोंचा तर कोविडच्यापूर्वीपासून म्हणजेच २०१८ पासूनही थकलेला आहे. आता कोविड गेला तरी थकबाकी फेडण्यात आलेली नाही.
कॅसिनो थकबाकी
ला केलिप्सो हॉटेल्स. ८७.११ कोटी
ट्रेड विंग्स हॉटेल्स लि. ८२.७० कोटी
एमकेएम गरँड गेमिंग एन्ट. ८०.०० कोटी
ब्रिटो एम्युजमेंट प्रा. लि १५.५३ कोटी
राफाईल्स स्कवेअर डे. प्रा लि. १०.०० कोटी
गोवन हॉटेल्स अँड रिअलिटी प्रा लि. ३३.२५ कोटी
गोल्डन ग्लोब हॉटेल्स प्रा लि. ३०.०० कोटी
बिग बी लेश्युर एलएलपी ११.०० कोटी
एकूण थकबाकी ३४९.९८ कोटी