गोव्यात नोव्हेंबरच्या 4 पासून 36 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, IOAचे राज्य ऑलिम्पिक असोसिएशनला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 12:36 PM2018-02-28T12:36:08+5:302018-02-28T12:36:08+5:30
राज्यात होणा-या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तारीख भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) जाहीर केली असून, ही स्पर्धा 4 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबरदरम्यान होणार आहे.
विलास ओहाळ/पणजी : राज्यात होणा-या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तारीख भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) जाहीर केली असून, ही स्पर्धा 4 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. तसे पत्र राष्ट्रीय क्रीडा परिषद आणि राज्य ऑलिम्पिक असोसिएशन यांना पाठविले आहे. राज्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेविषयी गेली चार-पाच वर्षापासून वेगवेगळे तर्क जाहीर केले गेले. त्याचबरोबर 2017 मध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राज्य सरकारने ऑलिम्पिक असोसिएशनला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे वेळापत्रक बदलण्याची विनंती केली होती. त्याचबरोबर राज्य सरकारला या क्रीडा स्पर्धेच्या धरसोडवृत्तीमुळे कोटय़वधी रुपयांचा दंडही सोसावा लागला होता. त्यामुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यात आयोजित करणे हे राज्य सरकारचा प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झालो होता.
गोव्यात पहिल्यांदाच झालेल्या ल्युसोफोनिया क्रीडा स्पर्धासाठी तयार केलेल्या पायाभूत सुविधांमुळे राज्य सरकारला अधिकतर नव्याने काही मोजक्याच सेवा सुविधा निर्माण कराव्या लागणार होत्या. गोव्यात स्पर्धा होणार असल्याने यापूर्वीच राज्य सरकारचे क्रीडा संचालनालय कामाला लागले आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यात विविध खेळांसाठी लागणा-या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. आता क्रीडा स्पर्धांना आठ महिन्यांचा कालावधी उरला आहे.
या स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्याने सरकारला पावसाळ्य़ानंतर केवळ दोन महिने मिळणार आहेत. त्यामुळे उन्हाळ्य़ातील मार्चपासून जूनपर्यतच्या कालावधीत जी आवश्यक कामे आहेत, ती पूर्ण करावी लागणार आहेत, तर पावसाळ्य़ानंतरच्या साठ दिवसांत काही कामे करता येणार आहेत. या कामांसाठी राज्य सरकारने सुमारे 230 कोटींच्या निधींची तरतूद या वर्षीच्या अंदाजपत्रात केलेली आहे. राज्य क्रीडा आणि युवा व्यवहार खात्याचे संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई यांनीही यापूर्वीच राज्य राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तयार असल्याचे सूतोवाच दिले होते