खेळाडूंना नोकरीत ४ टक्के आरक्षण; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 05:15 PM2023-11-10T17:15:02+5:302023-11-10T17:15:58+5:30
शानदार सोहळ्याद्वारे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोमंतकीय खेळाडूंनी ७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अविस्मरणीय कामगिरी करीत २७ सुवर्णपदकांसह एकूण ९२ पदके प्राप्त केली. या खेळाडूंना अधिक पाठबळ देण्यासाठी क्रीडा कोट्यामधून सर्व खात्यांत ४ टक्के जागा खेळाडूंसाठी आरक्षित ठेवण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर गुरुवारी क्रीडा स्पर्धेच्या समारोप सोहळ्यावेळी ते बोलत होते. उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
व्यासपीठावर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर, खासदार सदानंद शेट तानावडे, उत्तराखंडच्या क्रीडा मंत्री रेखा आर्या, महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे, राज्याचे क्रीडा मंत्री गोविंद गावडे, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी.टी. उषा, सदस्य अमिताभ शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'राज्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार की नाही याबाबत सांशकता होती; परंतु जुडेंगे, जियेंगे, जितेंगे या स्पर्धेच्या ब्रीदवाक्याप्रमाणे काम करीत आम्ही क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा यशस्वी केली. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शिक्षण खाते, पोलिस दल, अग्निशमन दल, क्रीडा संघटनांचा याला मोठा हातभार आहे. स्पर्धेतील गोव्याचे यश पाहता राज्यातील प्रत्येक संघटनेला खास एक मैदान उपलब्ध करून दिले जाईल.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'राष्ट्रीय स्पर्धेच्या अनुषंगाने येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा तयार झाल्या आहेत. पुढील काळात कायमस्वरूपी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करणे शक्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
पर्रीकर यांचे स्वप्न साकारले : क्रीडा मंत्री गावडे
क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करून आम्ही गोवा कुठल्याही क्षेत्रात मागे नाही, हे सिद्ध केले. दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पर्धेचा पाया रचला होता. त्यांनी त्यांची स्वप्नपूर्ती केली अशा भावना व्यक्त केल्या.
पुढच्या स्पर्धेत शतक
यंदा मिळालेल्या यशाने भारावलेल्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील खेळाडूंकडून पुढील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अधिक पदकांची अपेक्षा केली आहे. त्यांनी थेट 'अगली बार सौ के पार अशी घोषणाच केली. यंदा आम्ही ९० चा आकडा पार केला. पुढील स्पर्धेत हा आकडा शंभरावर पोहोचेल अशी आशा मला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
बदलत्या देशाचे चित्र दिसले : उपराष्ट्रपती
गोव्यातील या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यास महिलांचा मोठा हातभार आहे. क्रीडा सचिव, संचालक व इतर बहुतांश अधिकारी हे महिला आहेत, हे पाहून आनंद झाला. स्पर्धेत महिला खेळाडूंचा बोलबाला दिसून आला. त्यामुळे स्पर्धेच्या माध्यमातून एकप्रकारे बदलत्या देशाचे चित्र दिसले, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड केले. ते पुढे म्हणाले की, गोव्याने दर्जेदार स्पर्धेचे आयोजन करीत दाखवून दिले आहे. देशातील क्रीडाविश्व आता शिखर गाठत आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा जणू मिनी भारतच असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक २०३६ देशांत आयोजित करण्याचा निश्चय केला आहे. गोव्याने याचा पाया बन्यापैकी रचला आहे. येथील वातावरणात वेगळीच ऊर्जा मिळते, असे धनखड यांनी सांगितले.