'इफ्फी'साठी ४,३५७ प्रतिनिधींची नोंदणी; यंदा वाढला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2024 11:47 AM2024-11-09T11:47:58+5:302024-11-09T11:48:22+5:30
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील तीन वर्षे इफ्फीला चांगला प्रतिसाद मिळत नव्हता.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राजधानी शहरात २० ते २८ नोव्हेबरपर्यंत होणाऱ्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, प्रतिनिधी नोंदणीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदा इफ्फीसाठी गुरुवारपर्यंत ४,३५७ प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. मागील काही वर्षांमध्ये हा खूप चांगला प्रतिसाद आहे असे गोवा मनोरंजन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील तीन वर्षे इफ्फीला चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. कोरोना महामारी, तसेच जागतिक युद्धामुळे प्रतिनिधी नोंदणी घटली होती. पण, यावर्षी प्रतिनिधी नोंदणी सुरू झाल्यापासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदा ८ ते १० हजार पर्यंतही प्रतिनिधी होण्याची शक्यता आहे.
या प्रतिनिधी नोंदणीमध्ये चित्रपट अभ्यासक विद्यार्थी चित्रपटप्रेमी, तसेच अन्य चित्रपट क्षेत्राशी निगडित लोकांचा समावेश आहे. यात देश-विदेशांतील प्रतिनिधींचा सहभाग आहे. मोठ्या प्रमाणात देश-विदेशांतील प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे.
सजावटीचे काम जोरात
इफ्फीला फक्त १० दिवस शिल्लक असल्याने सजावटीचे काम जोरात सुरू आहे. गोवा मनोरंजन संस्थेच्या आवारात मंडप घालण्याचे कामही सुरु आहे. तसेच इफ्फीचे रंगीबेरंगी फलक लावले जात आहे. ठिकठिकाणी विद्युत माळा सोडण्याचे कामही सुरू आहे. तसेच रंगरंगोटीचे कामही जोरात सुरू आहे. यंदाचा हा २० वा इफ्फी असल्याने हा इफ्फी खास आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारनेही पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठकही झाली आहे.