गोव्यात चाळीस खनिज खाणी सुरू होणे शक्य
By admin | Published: October 19, 2016 09:24 PM2016-10-19T21:24:30+5:302016-10-19T21:24:30+5:30
राज्यात आता पावसाळा संपुष्टात आल्यामुळे एकूण पंचाऐंशी खनिज खाणींपैकी चाळीस खनिज खाणी येत्या महिन्याभरात नव्याने सुरू होतील, असे खाण खात्याने अपेक्षित धरले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 19 - राज्यात आता पावसाळा संपुष्टात आल्यामुळे एकूण पंचाऐंशी खनिज खाणींपैकी चाळीस खनिज खाणी येत्या महिन्याभरात नव्याने सुरू होतील, असे खाण खात्याने अपेक्षित धरले आहे.
वार्षिक वीस दशलक्ष टन खनिज उत्पादन मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने खनिज कंपन्यांना ठरवून दिलेली आहे. सरकारने 85 खनिज लिजांचे नूतनीकरण केलेले असले तरी, अनेक खनिज खाणींना अजून पर्यावरणविषयक दाखले मिळालेले नाहीत. चाळीस खाणींचे उत्पादन येत्या 30 दिवसांत सुरू होऊ शकेल, असे एका सरकारी अधिका-याने सांगितले. नवे आर्थिक वर्ष 31 मार्च 2017 रोजी संपणार असून तत्पूर्वी चाळीस खाणी एकूण वीस दशलक्ष टन खजिनाचे उत्पादन करू शकतील, असाही विश्वास सरकारला वाटतो.
..सेझा कामगारांचा मोर्चा
दरम्यान, डिचोली येथील सेझा कंपनीच्या कामगारांनी बुधवारी आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भेट घेतली. मात्र त्यांच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही. सेझाने आपले उत्पादन निलंबित केले आहे. डिचोलीचे नगराध्यक्ष सतिश गावकर व कामगार नेते अजितसिंग राणे यांच्यासोबत सेझाचे कामगार मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते. तथापि, अजितसिंग यांच्या उपस्थितीत आपल्याला काहीही बोलायचे नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली. दरम्यान, सरकारला सेझाच्या व्यवस्थापनाशी बोलून कामगारांची समस्या सोडविण्याची इच्छाच नाही, असा आरोप अजितसिंग यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना केला. कामगारांना सेझाच्या व्यवस्थापनाने लक्ष्य बनविले आहे व या स्थितीला सरकारही जबाबदार आहे. उद्या शुक्रवारपर्यंत तोडगा निघाला नाही तर आम्ही विविध संस्थांच्या सहभागाने डिचोली शहरात मोर्चा काढू, असे अजितसिंग यांनी सांगितले.