गोव्यातील 40 टक्के अंगणवाड्या शौचालयाविना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 02:52 PM2018-12-13T14:52:59+5:302018-12-13T14:53:44+5:30
स्वच्छ भारत अभियानाखाली संपूर्ण देश उघड्यावरील शौचापासून मुक्त करण्याचा विडा केंद्र सरकारने उचलला असला तरी लहान आकाराच्या विकसित राज्यामध्ये समाविष्ट असलेल्या गोव्यातील 40 टक्के अंगणवाड्यांना शौचालयाची सोय नसल्याचे शासकीय आकडेवरुनच स्पष्ट झाले आहे.
-सुशांत कुंकळयेकर
मडगाव - स्वच्छ भारत अभियानाखाली संपूर्ण देश उघड्यावरील शौचापासून मुक्त करण्याचा विडा केंद्र सरकारने उचलला असला तरी लहान आकाराच्या विकसित राज्यामध्ये समाविष्ट असलेल्या गोव्यातील 40 टक्के अंगणवाड्यांना शौचालयाची सोय नसल्याचे शासकीय आकडेवरुनच स्पष्ट झाले आहे. एवढेच नव्हे तर 8 टक्के अंगणवाडी केंद्रात पिण्याच्या पाण्याचीही सोय नसल्याचे उघड झाले आहे.
महिला व बाल कल्याण खात्याकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार गोव्यातील एकूण 1262 अंगणवाड्यांपैकी 754 (59.74 टक्के) अंगणवाड्यांत शौचालयाची सोय आहे तर 1164 अंगणवाडी केंद्रात पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
कित्येक अंगणवाडय़ात शौचालयाची सोय नसल्यामुळे या केंद्रात येणा-या मुलांना तसेच काम करणा-या कर्मचा-यांना एकतर उघड्यावर आपल्या विधी कराव्या लागतात किंवा शेजारी जाऊन त्यांच्या शौचालयाचा वापर करण्यासाठी विनंती करावी लागते. 0 ते 6 वर्षापर्यंतची मुले कुपोषणापासून दूर राहावीत या उद्देशाने अंगणवाड्यांची सोय केलेली असली तर या अंगणवाड्या मुलभूत सुविधांपासूनही दूर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यातील बहुतेक अंगणवाड्या ग्रामीण भागात भाड्याच्या खोलीत चालवल्या जात असून अगदी छोट्या जागेत चालवल्या गेलेल्या या केंद्रांत पिण्याचे पाणी, शौचालय, खेळण्यासाठी जागा तसेच स्वयंपाक घराची सोय नाही. गोव्यात 676 अंगणवाड्या अगदी छोट्या जागेत चालविल्या जात असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
73 अंगणवाड्या पंचायतींच्या जागेत किंवा समाज सभागृहात चालू असून फक्त 147 अंगणवाड्या सरकारी इमारतीत चालतात. अंगणवाड्यांसाठी पुरेशी जागा न मिळण्याचे कारण म्हणजे, या योजनेखाली ग्रामीण भागात भाड्यापोटी दरमहा एक हजार तर शहरीभागात चार हजार रुपये एवढे अल्प भाडे दिले जात असल्याने या केंद्रासाठी कुणी जागा द्यायला पुढे येत नाहीत.
यावर उपाय म्हणून कित्येक अंगणवाड्या जवळच्या शाळांमध्ये संलग्नीत केल्या आहेत. तर सरकारी आणि पंचायतीच्या जागेत 46 नवीन अंगणवाड्या बांधण्याचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. एकूण 299 अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडण्यात आलेल्या आहेत.